भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची आशा दिसायला लागली आहे. भारताने आपला दुसरा डाव ३२३ धावांवर घोषित करत आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं लक्ष्य दिलं. अखेरच्या काही षटकांसाठी मैदानात आलेल्या आफ्रिकेची सुरुवात मात्र खराब झाली. पहिल्या डावात आफ्रिकेकडून एकाकी झुंज देणारा डीन एल्गर दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतला. रविंद्र जाडेजाने त्याला २ धावांवर माघारी धाडलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कसोटी सामना वाचवण्यासाठी आफ्रिकेला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

त्याआधी, पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक खेळ केला. सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही शतक झळकावत भारताची बाजू भक्कम केली. मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर रोहितने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यादरम्यान रोहित शर्माने आपलं शतकही पूर्ण केलं. कसोटी कारकिर्दीतलं रोहितचं हे पाचवं शतक ठरलं. चेतेश्वर पुजाराने ८१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय रविंद्र जाडेजा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनीही झटपट धावा करत ३२३ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.

दरम्यान सेनुरन मुथुस्वामी आणि कगिसो रबाडा यांनी अखेरच्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी रचत पहिल्या डावात आफ्रिकेच्या धावसंख्येत ४६ धावांची भर घातली. अखेरीस आश्विननेच दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक यांनी शतकं झळकावत आफ्रिकेवरील फॉलोऑनचं संकट टाळलं होतं. मात्र भारताने अखेरच्या सत्रात आफ्रिकेला दोन धक्के देत, पाहुण्या संघाची अवस्था ८ बाद ३८५ अशी केली होती. यानंतर अखेरच्या दोन फलंदाजांनाही आश्विनने माघाडी धाडत भारताची बाजू भक्कम ठेवली होती. त्यामुळे आफ्रिकेचे फलंदाज उरलेल्या दिवसांत कसा खेळ करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.