दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्या दरम्यान त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याने श्रीलंकेच्या माजी धडाकेबाज फलंदाजाचा विक्रम मोडला.

रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. एखाद्या संघाकडून प्रथमच सलामीला फलंदाजी करतानाची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

या आधी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशन याने २००९ साली गॉल येथील कसोटी क्रिकेट सामन्यात २१५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून प्रथमच त्याला सलामीला न्यूझीलंड संघाविरूद्ध संधी देण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या डावात त्याची शतकाची संधी हुकली होती. तो ९२ धावांवर माघारी परतला होता. पण दुसऱ्या डावात मात्र त्याने शतकाला गवसणी घातली होती. त्या डावात तो १२३ धावांवर नाबाद राहिला होता.