यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात असून आज (६ सप्टेंबर) भारत-श्रीलंका यांच्यात रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात श्रीलंकेने भारतावर सहा गडी राखून विजय मिळवला. फलंदाजीसोबतच श्रीलंकेने गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली. त्यांनी २० षटकांत भारताच्या एकूण आठ फलदाजांना बाद केलं. असे असले तरी दीपक हुडाला बाद देताना पंचांचा चांगलाच गोंधळ उडाला. दीपकला एकदा बाद देऊन पंचांनी आपला निर्णय मागे घेतला.

सामन्यात नेमकं काय घडलं?

१८ व्या षटकापर्यंत भारताची परिस्थिती बिकट झाली होती. भारताचे पाच गडी बाद आणि १५० धावा अशी स्थिती होती. अठवरावे षटक टाकण्यासाठी दासून शनाकाने चेंडू हातात घेतला होता. अठराव्या षटकाचा तीसरा चेंडू टाकल्यानंतर दीपकने त्याला अपर कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फटका मारल्यानंतर चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. त्यानंतर दीपकला बाद देण्यात आले. दीपक मैदान सोडून जात होता. मात्र पंचानी पुन्हा एकत्र येत थर्ड अंपायरची मदत घेतली. त्यानंतर नो बॉल असल्याच समोर आले. परिणामी दीपक हुडाला एकदा जीवदान मिळाले.

मात्र एकदा जीवदान मिळूनही दीपक चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने चार चेंडू खेळले आणि फक्त ३ धावा केल्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने कर्णधार म्हणून आपली भूमिका चोखपणे पार पाडली. तसेच सूर्यकुमार यादवनेही समाधानकारक खेळ केला. रोहितन ४१ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. तर सूर्यकुमारन २९ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला.