भारतीय कर्णधार विराट कोहलीने आजतागत अनेक विक्रम मोडले आहेत. विडिंजविरोधात होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला २६ वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी आहे. भारत आणि वेस्ट विंडिज यांच्यादरम्यान दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आज रविवार होणार आहे. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. भारताने तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत व्हाइट वॉश दिला आहे.

कोहलीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त १९ धावा केल्या, तर तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादला याचा विक्रम मोडीत काढणार आहे. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज जावेद मियांदाद आहे. मियांदादने विडिंजविरोधात ६४ डावांत एकूण १९३० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने आतापर्यंत विडिंजविरोधात ३३ डावांमध्ये १९१२ धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. मियांदादचा हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त १९ धावांची गरज आहे. विराट कोहलीने १९ धावा केल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो अव्वल फलंदाज ठरणार आहे.

विडिंजविरोधात भारतीय खेळाडूंच्या सर्वाधिक धावांचा विचार केल्यास विराट कोहली अव्वल स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर सचिन आणि तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविडचा क्रमांक लागतो. सचिनने ३९ डावांत १५७३ धावा केल्या आहेत. तर द्रविडने ३८ डावात १३४८ धावा केल्या आहे.

विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज

जावेद मियांदाद (पाकिस्तान) – १९३० धावा
विराट कोहली (भारत) – १९१२ धावा
मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) – १७०८ धावा
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – १६६६ धावा
रमीझ राजा (पाकिस्तान) – १६२४ धावा