फुटबॉल या खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कोलकातावासीयांच्या साक्षीने रविवारी फुटबॉलमधील पहिल्यावहिल्या इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला. देश, धर्म, जात, पात, राज्य या साऱ्यांना भेदत एकमेव नांदणारी भाषा म्हणजे संगीत. भारताशी नाते सांगणाऱ्या ‘इंडियन संगीत लिग’ची अनुभूती आयएसएलच्या सोहळ्यात साऱ्यांनाच लुटता आली. आयएमजी रिलायन्सच्या अध्यक्षा आणि फुटबॉल खेळ विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांनी ‘आम्ही इंडियन सुपर लीग इर सुभो सुचोना कोरची’ अशा बंगाली भाषेमध्ये आयएसएलचे औपचारिक उद्घाटन केल्याचे जाहीर केले. बॉलीवूडचे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन, उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासह संघांचे सेलिब्रेटी सहमालक यांच्या उपस्थितीने सोहळ्याला चार चाँद लावले.
सॉल्ट लेक स्टेडियममध्ये ७० हजार फुटबॉलप्रेमींनी एकच गर्दी केली होती, या साऱ्यांना उत्सुकता होती ती आयएसएलच्या उद्घाटन सोहळ्याची. फटक्यांच्या आतिषबाजीने स्टेडियम न्हाऊन निघाले आणि एकच संगीतमय जल्लोष सुरू झाला.
सुरुवातीला कोलकाताचे प्रसिद्ध वादक बिक्रम घोष, त्यानंतर चेन्नईचे प्रसिद्ध वादक शिवमणी, मुंबईचे प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी, मणिपुरी ढोल, केरळचा चेंडा, गोव्याचा बोंडू, पुणेरी ढोल आणि दिल्लीच्या अस्लम ढोलने एकच रंगत आणली. प्रत्येकाने आपल्या संघासाठी खास पारंपरिक ताल धरला होता, तर नर्तिकांनीही चांगलाच ठेका धरलेला होता. पारंपरिक आणि पाश्चिमात्य संगीताचा एक अनोखा श्रवणीय संगम या वेळी साऱ्यांनीच अनुभवला.
‘देसी गर्ल’ आणि बॉलीवूडची आघाडीची नायिका प्रियांका चोप्राने ‘तुमने मारी एंट्री और दिल में बजी घंटी’ या गाण्यासारखीच दिलखेचक प्रवेश करत साऱ्यांचीच मने जिंकली. त्यानंतर ‘आज की रात..’ आणि ‘राम चाहे, लीला चाहे..’ या गाण्यांवर तिने अदा सादर करत संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांना नाचायला लावले. संगीतकार सलीम-सुलेमान यांच्या ‘सलाम इंडिया’ या गाण्याने साऱ्यांनाच ठेका धरायला लावला.
रंगतदार कार्यक्रमानंतर प्रत्येक संघाच्या सहमालकांची ओळख करून दिली. अ‍ॅटलेटिको डी कोलकाताचा सहमालक आणि माजी कर्णधार सौरव गांगुली मैदानात उतरल्यावर साऱ्यांनीच ‘दादा, दादा’चा जल्लोष केला. दिल्ली डायनामोस संघाकडून बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री परिणिती चोप्रा, नॉर्थ-ईस्ट एफसी संघाचा सहमालक, फुटबॉलप्रेमी आणि बॉलीवूडचा नायक जॉन अब्राहम, एफसी गोवा संघाचे दत्तराज साळगावकर, चेन्नई एफसी संघाचा सहमालक आणि बॉलीवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन, एफसी पुणे संघाचा सहमालक आणि बॉलीवूडचा अभिनेता हृतिक रोशन, मुंबई सिटी एफसी संघाला सहमालक आणि बॉलीवूडचा अभिनेता रणबीर कपूर हे सारे व्यासपीठावर अवतरले. अखेर केरळ ब्लास्टर संघाचा सहमालक आणि माजी महान क्रिकेटपटू मैदानावर अवतरणार हे समजताच लोकांनी ‘सचिन.. सचिन’चा एकच जल्लोष करत उभे राहून त्याला मानवंदना दिली.
आयएसएलचे उद्घाटन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते होणार असल्याचे घोषित झाले असले तरी यामध्ये बदल करत नीता अंबानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत साऱ्यांचीच मने जिंकून घेतली. या वेळी त्यांनी आयएसएलच्या उद्घाटनासाठी कोलकात्याची निवड केल्याने मी आभारी आहे, असे म्हटले. त्यानंतर ‘लेट्स लव्ह फुटबॉल, इट फुटबॉल, थिंक फुटबॉल, स्लीप फुटबॉल आणि ड्रिंक फुटबॉल’ अशी घोषणा केल्यावर स्टेडियमध्ये एकच जल्लोष झाला. या वेळी ममता यांच्यासह नीता अंबानी आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.