आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारताने लौकिकाला साजेसा खेळ करत संयुक्त अरब अमिरातीवर नऊ विकेट्स राखत सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमिरातीला भारताने ८१ धावांवर रोखले. या माफक आव्हानाचा एका फलंदाजाच्या मोबदल्यात भारताने यशस्वी पाठलाग केला.
अमिरातीने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी भारताने सुरुवातीपासूनच धक्के दिले. अमिरातीने सातत्याने फलंदाज गमावल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांच्या नऊ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या रचण्यातही अपयशी ठरले, तर त्यामधील चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. अमिरातीच्या फलंदाजीला अपवाद ठरला तो शैमन अन्वर. भारताच्या गोलंदाजीचा चांगला सामना करत अन्वरने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. या सामन्यात पुनरागमन करणारा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ८ धावांमध्ये दोन बळी मिळवले.
अमिरातीच्या ८२ धावांचा पाठलाग करताना भारताने ४३ धावांची सलामी दिली, यामध्ये ३९ धावांचा वाटा सलामीवीर रोहित शर्माचा होता. रोहितने धडाकेबाज फलंदाजी करत २८ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३९ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. रोहित बाद झाल्यावर सलामीवीर शिखर धवन (नाबाद १६) आणि युवराज सिंग (नाबाद २५) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धवन या वेळी अडखळत खेळताना दिसत होता. पण रोहित बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या युवराजने मात्र दमदार फटकेबाजी करत चार चौकार आणि एक षटकारही लगावला.

संक्षिप्त धावफलक
संयुक्त अरब अमिराती : २० षटकांत ९ बाद ८१ (शैमन अन्वर ४३; भुवनेश्वर कुमार २/८) पराभूत वि. भारत : १०.१ षटकांत १ बाद ८२ (रोहित शर्मा ३९, युवराज सिंग २५; कादीर अहमद १/२३).