कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखताना पदकांचा षटकार ठोकला. सोमवारी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली. या कामगिरीसह भारत १३ (४ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य) पदकांसह रशियापाठोपाठ (१४) दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताने पहिल्या दिवशी तीन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळाले. यशस्विनी सिंग, मलाईका गोयल व हर्षदा निथावे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ११२२ गुणांची कमाई केली. रौप्यपदक जिंकणाऱ्या टर्की संघाला ११०४ गुण मिळाले, तर उजबेकिस्तानने १०८६ गुण नोंदवीत कांस्यपदक मिळविले. वैयक्तिक विभागात मार्गारिटा लोमोवा (रशिया), अॅना देदोवा (चेक प्रजासत्ताक) व अफाफ एल्होदोद (इजिप्त) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळविले.
गौरव राणा, हेमेंद्र कुशवाह व सौरभ चौधरी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कनिष्ठ पुरुष गटात दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्यपदक पटकाविले. वैयक्तिक गटात अनमोलकुमारने रौप्यपदक मिळविले. त्याने १९७.५ गुण घेतले. रशियाच्या आर्तेम चेनरेसोव याने १९९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर त्याचा सहकारी एवगेनी बोरोवोई याला कांस्यपदक मिळाले.
गायत्री नित्यानंदमने सोनिका व आदिती सिंग यांच्या समवेत ५० मीटर रायफल थ्रीपोझिशन या क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळविले. गायत्रीने वैयक्तिक विभागातही कांस्यपदक जिंकले. तिने ४३८.९ गुण नोंदविले. निकोला फोईस्तोवा (चेक प्रजासत्ताक) व ओल्गा एफिमोवा (रशिया) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. त्यांना अनुक्रमे ४५१.५ व ४५०.६ गुण मिळाले. दिलरीन गिलनेदेखील अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. स्कीट प्रकारात अनंतजीतसिंग नरुका, सुखबीरसिंग हरिका व हामझा शेख यांचा समावेश असलेल्या भारतीय संघास कांस्यपदक मिळाले. त्यांना ३३७ गुण मिळाले. रशिया (३६०) व चीन (३३९) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.