दुबई : मोहम्मद शमी उत्कृष्ट गोलंदाज असून त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. मात्र, त्याची शैली ही कसोटी क्रिकेटला साजेशी असून ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी भारताकडे वेगवान गोलंदाजांचे त्याच्यापेक्षा दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.

‘‘शमीने अनेक वर्षे भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु तुम्ही त्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, तो कसोटीमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करतो हे स्पष्ट होते. ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी भारताकडे वेगवान गोलंदाजांचे शमीपेक्षा दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. आशिया चषकासाठी त्यांनी तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी भारताने चौथ्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्याचे ठरवल्यास शमीला संधी मिळू शकेल,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी भारताने भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान या वेगवान त्रिकुटाची संघात निवड केली आहे. शमीला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीही भारतीय संघात स्थान मिळेल याची पॉन्टिंगला खात्री नाही.

आशिया चषकासाठी भारत प्रमुख दावेदार!

आशिया चषक स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असून जेतेपदासाठी भारतीय संघ प्रमुख दावेदार आहे, असे पॉन्टिंगला वाटते. ‘‘आशिया चषकच नाही, तर कोणत्याही स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असतो,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.