वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळण्यास तयार

टीम इंडिया स्वतःला २ आठवडे क्वारंटाइन करणार

जगभरातील अर्थव्यवस्थेला करोना विषाणूचा चांगलाच फटका बसला आहे. क्रीडा विश्वाचं अर्थचक्रही या काळात गाळात रुतलं आहे. महत्वाच्या स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयसीसी व सर्व महत्वाच्या क्रिकेट बोर्डांचं मोठं नुकसान होत आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. बोर्डाने आपल्या ८० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. याचसोबत टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता, ही मालिका रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.

हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार टीम इंडियाला वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात प्रवासाची परवानगी देणार असल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. बीसीसीआयनेही वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. मात्र या स्पर्धेआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात स्वतःला दोन आठवडे क्वारंटाइन करेल अस मतही बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी मांडलं आहे. “कसोटी मालिका खेळायची असेल तर स्वतःला क्वारंटाइन करण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु करायचं असेल तर हे करावंच लागेल. दोन आठवड्यांचा कालावधी हा कोणत्याही क्रीडापटूसाठी योग्य आहे. फक्त त्याआधी दोन्ही देशांमधलं सरकार नेमकं काय नियम आखून देतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” धुमाळ The Sydney Morning Herald वृत्तपत्राशी बोलत होते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली कसोटी मालिका रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 300 million Australian dollars चं नुकसान होणार आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन सरकारने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या देशाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. दरम्यान आपलं नुकसान भरुन काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रस्तावित ४ कसोटी सामन्यांची मालिका ५ सामन्यांची खेळवली जावी या विचारात आहे. मात्र बीसीसीआयने यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचं धुमाळ यांनी स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India ready for 2 week quarantine in australia to ensure series goes ahead says bcci psd

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या