२०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेआधी हॉकी इंडियाने आपल्या रणनितीमध्ये मोठा बदल केला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या FIH Pro League स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. १८ जानेवारी २०२० पासून भारताच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे. यानंतर भारतीय संघ ८-९ फेब्रुवारीदरम्यान विश्वविजेत्या बेल्जियम संघाशी घरच्या मैदानावर दोन हात करणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणाऱ्या सर्वोत्तम संघांना या महत्वाच्या स्पर्धेत सहभाग मिळतो. पहिल्या वर्षी भारतीय संघाने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

भारतीय हॉकी संघाचं FIH Pro League स्पर्धेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

२०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ अद्याप पात्र झालेला नाहीये, यासाठी भारताला ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळावं लागणार आहे. मात्र ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम संघांचा असणारा सहभाग लक्षात घेता भारताने Pro League स्पर्धेत खेळणं महत्वाचं असल्याचं मत, भारताने प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी व्यक्त केलं होतं. “आगामी वर्षात Pro League स्पर्धेत खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर्वोत्तम संघांविरोधात खेळणं हे भारतीय खेळाडूंसाठी गरजेचं आहे. या स्पर्धेतून आगामी ऑलिम्पिकसाठी खेळाडू किती तयार आहेत हे लक्षात येईल”, रिड यांनी आपली प्रतिक्रीया दिली. भारताचा कर्णधार मनप्रीत सिंहने या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.