भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहली याने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ‘कमबॅक’ करत ५ बळी टिपले. पहिल्या ४ कसोटी सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मात्र दुसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल ५ विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

१ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १८ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे.

१३ – लोकेश राहुलने आतापर्यंत या मालिकेत १३ झेल पकडले आहेत. या कामगिरीसह राहुलने भारताच्या राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली असून इंग्लंडच्या वॅली हॅमोंड यांचा १२ झेलांचा विक्रम मागे टाकला आहे. हॅमोंड यांनी १९३४ सालच्याअॅशेल मालिकेत १२ झेल पक़डले होते, तर राहुल द्रविडने २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत १३ झेल पकडले होते.

३८ – भारताविरुद्ध सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत अॅलिस्टर कूक दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. आतापर्यंत कूकने ३८ झेल पकडले आहेत. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू सर व्हिवीएन रिचर्ड्स पहिल्या स्थानावर आहेत.

५९ – भारताच्या जलदगती गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत आतापर्यंत ५९ बळी घेतले आहेत. या कामगिरीसह १९७९-८० सालात कपिल देव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला ५८ बळींचा विक्रम भारताच्या सध्याच्या गोलंदाजांनी मागे टाकला आहे.

१०७ – जेम्स अँडरसनने आतापर्यंत भारताविरुद्ध १०७ बळी घेतले आहेत. चेतेश्वर पुजाराला बाद करुन अँडरसनने हा विक्रम आपल्या नावे केला. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधनरच्या नावे आधी या विक्रमाची नोंद होती. मुरलीधरनने भारताविरुद्ध १०५ बळी मिळवले होते.