ट्रेंटब्रिज येथे झालेल्या इंग्लंड व भारत यांच्यातील पहिल्या कसोटीची खेळपट्टी खराब होती, अशी टीका सातत्याने होत असेल तर ही खेळपट्टी तयार करणाऱ्यांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे, असे ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी सांगितले.
खराब खेळपट्टीमुळे गोलंदाजांना अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. जर खेळाडूंना त्यांची गुणवत्ता दाखविता येत नसेल, तर अशी खराब खेळपट्टी तयार करणाऱ्यांना तात्काळ दूर केले पाहिजे. त्यांच्याऐवजी अन्य योग्य व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपविली पाहिजे असे सांगून चॅपेल म्हणाले, चांगल्या दर्जाच्या खेळपट्टीवर खेळाडूंचा कमकुवतपणा दिसून येतो व खेळाच्या हितासाठी ही चांगलीच गोष्ट असते. त्यामुळे निवड समितीलाही योग्य खेळाडूची निवड करणे सोपे होते. जर एखादा खेळाडू सातत्याने खराब कामगिरी करीत असेल, तर त्याला वगळण्यासाठी संयुक्तिक कारणेही मिळतात.
खेळपट्टी करणाऱ्या व्यक्तीच्या कामात कोणत्याही खेळाडू किंवा संघटकांची ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. या क्युरेटरलाही काही प्रतिष्ठा आहे. त्याच्या कामात कोणी ढवळाढवळ केली, तर त्याचे काम चांगले होणार नाही.
कसोटीत पाचव्या दिवसापर्यंत खेळपट्टी चांगल्या दर्जाची राहणे आवश्यक असते असेही चॅपेल यांनी सांगितले.