इराणकडून ७७-४७ असा दारुण पराभव
भारतीय पुरुष संघाला फिबा आशिया चॅलेंज बास्केटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले. उपांत्यपूर्व फेरीत इराणने ७७-४७ अशा फरकाने भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवामुळे भारताच्या २०१७ साली होणाऱ्या आशिया चषक स्पध्रेची पात्रता मिळवण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्यांना जपानविरुद्धच्या ५-६ क्रमांकाच्या लढतीत विजय मिळवावा लागेल. अव्वल पाच संघांना आशिया चषक स्पध्रेत प्रवेश मिळणार आहे.
भारताने पहिल्या दोन सत्रांत इराणला कडवे आव्हान देत मध्यंतरापर्यंत सामना ३१-३८ असा अटीतटीचा राखला होता. मात्र तिसऱ्या सत्रात भारताचे सर्व डावपेच हाणून पाडत इराणने ७ गुणांची आघाडी २९ अशी वाढवली. तिसऱ्या सत्रात भारताला केवळ दोनच गुण मिळवण्यात यश आले, तर इराणने २६ गुणांची कमाई केली. अखेरच्या सत्रात भारताने १४-१३ अशी आघाडी घेतली, परंतु पराभव टाळण्यासाठी ती पुरेशी नव्हती. इराणच्या हमेद हदारीने सर्वाधिक १७ गुणांसह, २३ रिबाऊंड आणि ४ गुणांसाठी साहाय्य केले. भारताकडून विशेष ब्रिघुवंशीने १४ गुणांसह कडवी टक्कर दिली. मात्र अनुभवी खेळाडू अमज्योत सिंग आणि अमरीतपाल सिंग यांनी महत्त्वाच्या क्षणी कच खाल्ली.