भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी दोन्ही संघातील खेळाडू आणि त्यांच्या रणनितीची चर्चा रंगत असताना ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकाराने खोडसाळपणा केलाय. ऑस्ट्रेलियातील पत्रकार डेनिस फ्रिडमॅन याने त्याच्या ट्विट अकाउंटवरुन विराट कोहलीसह भारतीय संघातील खेळाडूंचा एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये भारतीय खेळाडू मैदानात साफसफाई करताना दिसत आहेत. हा फोटो मागील वर्षीचा आहे. मागील वर्षी भारतीय संघाने कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर स्वच्छता मोहिम राबवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानमधील लाहोरच्या मैदानावर रंगलेल्या विश्व इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी लाहोरच्या मैदानावर भारतीय खेळाडू साफसफाईचे काम करत आहेत, असे कॅप्शन फ्रिडमॅनने या फोटोला दिले आहे. फ्रिडमॅनच्या या ट्विटवर पाकिस्तानी तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी चाहते या ट्विटचा आनंद घेत असताना भारतीय चाहत्यांनी या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे.

२००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मैदानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेल्या आठवर्षांपासून बंद होते. आयसीसीने विश्व इलेव्हन संघ आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्याने पुन्हा एकदा पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. क्रिकेट जगतातील अनेक संघातील खेळाडू विश्व इलेव्हन संघात सामील झाले. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली नाही. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी नसल्यामुळेच ऑस्ट्रेलियन पत्रकाराने ट्विटच्या माध्यमातून टोमणा मारला. ट्विटरवर उमटणाऱ्या प्रतिक्रियामुळे त्याला हे ट्विट चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia 2017 australian journalist trolls team india on twitter
First published on: 13-09-2017 at 11:19 IST