भारतासाठी करो या मरोची स्थिती असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २९६ धावांचे आव्हान ठेवले आहे. विराट कोहलीची शानदार शतकी खेळी आणि शिखर धवन, अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकांमुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २९६ धावांचे आव्हान ठेवता आले.
मागील दोन सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्याने भारताच्या धावांची सुरुवात अडखळत झाली. त्यानंतर कोहली व धवनने खेळपट्टीवर स्थिरावत धावफलक हालता ठेवला. शिखर धवनने ६८ धावांचे योगदान दिले.  धवन बाद होताच मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणेने आक्रमक खेळी करत ५५ चेंडूत ५० धावा केल्या. कोहलीने आपला खेळ कायम ठेवताना रहाणेच्या साथीने भारताची धावसंख्या दोनशेच्या पार नेली. रहाणेनेही त्याला चांगली साथ दिली आणि कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील २४ वे शतक साजरे केले. त्याने सहा चौकार आणि एक षटाकाराच्या साहाय्याने १०५ चेंडूत शतक पूर्ण केले. कोहलीने शतकानंतर झटपट धावा जमाविण्यास सुरवात केली. पण, तो ११७ धावांवर बेलीकडे झेल देऊन बाद झाला. कर्णधार धोनीने ९ चेंडूत २३ धावा करून भारताला ३०० धावांच्या जवळपास नेले. अखेर निर्धारित ५० षटकांत भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात २९५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉन हेस्टिंग्जने चार बळी मिळविले.
वेगवान खेळपट्ट्यांवर बहरलेल्या फलंदाजीला गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली होती़. सलग दोन सामने गमावून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-२ असे पिछाडीवर पडल्याने भारतीय संघासमोर मालिका गमावण्याचे संकट उभे ठाकले आहे़. त्यामुळे आज होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करून मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला शर्थीने लढा द्यावा लागणार आहे़.