हनुमा विहारीनं स्नायू दुखावल्यानंतरही सिडनी कसोटीतील पाचव्या दिवशी संयमी फलंदाजी करत भारताचा पराभव टाळत सामना अनिर्णीत राखला. हनुमा विहारीनं अश्विनच्या साथीनं पाचव्या दिवसाचं तिसरं सत्र संपूर्ण खेळून काढलं. मांडीचे स्नायू ताणले गेले असतानाही विहारी तटबंदीप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या विजायाच्या मार्गात भक्कमपणे उभा राहिला. या ऐतिहासिक सामन्यातील फलंदाजीवर हनुमा विहारीनं प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयनं याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात फलंदाजी करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. हा अनुभव मला आयुष्यभरासाठी मदतीला येईल. फलंदाजी करत असताना अश्विननं एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे सल्ला दिला. जेव्हा कधी मी खराब शॉट मारतोय, असं वाटलं तेव्हा अश्विनने खेळावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. अश्विनचा सल्ला फलंदाजी करताना फायदाचा ठरला. त्यामुळेच आम्ही तीन तासांपेक्षा जास्त कालावधी मैदानावर तग धरुन होतो, ‘ असं विहारी म्हणाला.

आणखी वाचा- भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

पुढे बोलताना विहारी म्हणाला की, ‘सिडनी कसोटी सामना अनिर्णीत राहिला हे चांगलं वाटत आहे. पण मला दुखपत झाली नसती आणि पुजारानं आणखी काहीवेळ मैदानावर तग धरला असता तर सामन्याचा निकाल आणखी चांगला लागला असता. आपला विजयही झाला असता.’ .

आणखी वाचा- मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला चौथ्या कसोटीत संधी मिळण्याचे संकेत

‘आम्हा दोघांना दुखापत झाली होती, पण आम्हाला एकाग्रता तोडायची नव्हती. खराब फटके मारायचे नव्हते. शेवटच्या चार-पाच षटकांमध्ये आपण जवळ आहोत हे दिसत होतं, पण आता पडू का काय, असं वाटत होतं. एक-एक धाव काढून स्ट्राईक रोटेट करत होतो.  शेवटच्या काही षटकांमध्ये आम्ही इतके थकलो होतो, की सामन्यानंतर आम्हाला सेलिब्रेशनही करता आलं नाही, ‘अशी प्रतिक्रिया आर.अश्विन यानं बीसीसीआयशी बोलताना दिली.