अनुकूल रॉयची भेदक फिरकी तसेच हार्विक देसाई व हिमांशू राणा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत इंग्लंडवर १२९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताची सुरुवात आश्वासक झाली नसली तरी राणाने सुरुवातीला दमदार फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. राणाने १० चौकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. राणा बाद झाल्यावर भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला होता. पण त्यानंतर हार्विकने ६२ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या आणि त्यामुळे भारतीय युवा संघाला २८७ धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताच्या २८७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के बसत गेले आणि यामधून त्यांना सावरता आले नाही. सुरुवातीला कमलेश नागरकोटी, शिवम मावी आणि इशान पोरल यांनी भेदक मारा करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्यानंतर डावखुरा फिरकीपटू रॉयने तिखट मारा करत इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकलले.
संक्षिप्त धावफलक
- भारत : ५० षटकांत ८ बाद २८७ (हार्विक देसाई ७५, हिमांशू राणा ५८; मॅथ्यू फिशर ४/४४) विजयी वि. इंग्लंड : इंग्लंड : ३३.४ षटकांत सर्वबाद १५८ (डेलरे रॉवलिन्स ४६; अनुकूल रॉय ३/३४, शिवम मावी २/१३).