उपांत्यपूर्व फेरीत आज मलेशियाशी सामना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलाढय़ नेदरलँड्सकडून साखळी गटातील अखेरच्या लढतीत पराभव पत्करणारा भारतीय पुरुष हॉकी संघ विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. जागतिक हॉकी लीगच्या (उपांत्य फेरीचा टप्पा) उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर आज मलेशियाचे आव्हान असणार आहे.

स्कॉटलंड, कॅनडा आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ ‘ब’ गटातील अव्वल स्थानाकडे झेपावला होता, परंतु नेदरलँड्सने हा विजयरथ रोखून भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानण्यास भाग पाडले. नेदरलँड्सविरुद्ध पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेल्या अपयशामुळे हा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मलेशियाविरुद्ध ही चूक टाळण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. ‘‘नेदरलँड्सविरुद्धचा सामना हा आव्हानात्मक होता आणि आमच्याकडे विजयाची संधीही होती. या सामन्यातील सकारात्मक बाब अशी की आम्ही ०-३ अशा पिछाडीवरूनही पुनरागमन केले, परंतु विजयासाठीचे प्रयत्न कमी पडले,’’ असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले.

जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या, तर मलेशिया १४व्या स्थानावर आहे. मात्र, त्यांना कमी लेखण्याची चूक भारताला महागात पडू शकते. आक्रमणपटू आकाशदीप सिंग हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याला एस. व्ही. सुनील, तलविंदर सिंग आणि मनदीप सिंग यांची साथ मिळणे गरजेचे आहे. मधल्याफळीत सरदार सिंग आणि कर्णधार मनप्रीत सिंग यांच्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ रुपिंदरपाल सिंगच्या अनुपस्थितीत हरमनप्रीत सिंग आणि जसजीत सिंग हे जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. याउलट अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत विकास दाहिया आणि आकाश चिकटे यांची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे.

आम्हाला खबरदारीने खेळ करायला हवा आणि चुकीला जागा ठेवता कामा नये. कारण, जराशी चुकही या स्पध्रेतून आमचे आव्हान संपुष्टात आणू शकते. मलेशियाचा संघ तुल्यबळ आहे.  आमच्या खेळाडूंकडून काही अप्रतिम मैदानी गोल झाले आहेत व ती आमच्यासाठी जमेची बाब आहे. आघाडीपटूंच्या कामगिरीवर समाधानी आहे.  -रोलँट ओल्टमन्स, भारतीय संघाचे प्रशिक्षक

  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs malaysia hockey
First published on: 22-06-2017 at 02:45 IST