तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने पहिला विजय मिळवत या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. श्रीलंकेविरुद्धचा भारताचा अखेरचा साखळी सामना मंगळवारी खेळवला जाणार असून ही भारतासाठी अखेरची संधी असेल. भारताने जर हा सामना जिंकला तर त्यांना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळू शकते, पण जर भारताच्या पदरी पराभव पडला तर त्यांना या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे.
स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजवर ११० धावांनी विजय मिळवत ‘बोनस’ गुण पटकावल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान टिकून राहिले आहे. या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या शतकाचा आणि सलामीवीर शिखर धवनच्या अर्धशतकाचा अमूल्य वाटा होता. या दोघांना सूर गवसलेला दिसत असला तरी अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव भेदक मारा करत असले तरी त्यांच्यापुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान असेल. भारताच्या अन्य गोलंदाजांनाही हवी तशी छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्यामध्ये झालेला वाद शमला नसेल, तर त्याचे विपरीत परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसू शकतील.
श्रीलंकेच्या संघात या मालिकेत सातत्य पाहायला मिळालेले नाही. उपुल थरंगा आणि महेला जयवर्धने यांची भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातली खेळी सोडल्यास त्यांना त्यानंतर चांगली कामगिरी करता आलेली नाही. कुमार संगकारालाही हवा तसा सूर गवसलेला नाही. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज हा चांगला अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळालेली नाही. गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा हा त्यांचा हुकमी एक्का असला तरी त्यालाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. दोन्हीही संघ चांगलेच तुल्यबळ असले तरी सातत्याचा अभाव आणि सूर न गवसलेले खेळाडू हे त्यांच्यामध्ये साम्य आहे. त्यामुळे या सामन्यात ज्या संघाचे खेळाडू दर्जेदार कामगिरी करतील, त्यांच्या बाजूने सामना झुकेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मुरली विजय आणि अंबाती रायुडू.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), उपुल थरंगा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, दिनेश चंडिमल, लहिरू थिरीमाने, नुवान कुलसेकरा, जीवन मेंडिस, रंगना हेराथ, लसिथ मलिंगा आणि अजंथा मेंडिस.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट आणि टेन स्पोर्ट्स वाहिनीवर
वेळ : संध्याकाळी ७.०० वा.पासून.