जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे -अंजू

मी युरोपीयन व अमेरिकन खेळाडूंप्रमाणे मेहनत घेतली म्हणून त्या स्तरावर यश प्राप्त करू शकले

Anju Bobby George
भारताची महान लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज

अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी मोठय़ा संख्येने नियमित सहभागी व्हावे, असा सल्ला भारताची महान लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने दिला आहे.

२००३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकणारी अंजू म्हणाली, ‘‘बहुतांश भारतीय खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होण्यापेक्षा प्रशिक्षणावरच भर देतात. भारताच्या अव्वल खेळाडूंनी युरोपीयन व अमेरिकन खेळाडूंसारखी व्यावसायिकता जपली पाहिजे. पूर्वीपेक्षा आता पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊनही आपले खेळाडू फक्त सराव व प्रशिक्षणावरच लक्ष केंद्रित करतात.’’

‘‘आपण फक्त प्रशिक्षण म्हणजेच ५० टक्के भाग करीत आहोत, पण ग्रँड प्रिक्स व डायमंड लीग यांच्यासारख्या उच्चस्तरीय स्पर्धामध्ये भारताला यश मिळणे कठीण झाले आहे. फक्त भारतात प्रशिक्षण घेऊन ऑलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये आपल्याला पदक पटकावता येणार नाही. यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झाले पाहिजे. मी युरोपीयन व अमेरिकन खेळाडूंप्रमाणे मेहनत घेतली म्हणून त्या स्तरावर यश प्राप्त करू शकले,’’ असे अंजूने सांगितले.

जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाविषयी विचारले असता अंजू म्हणाली, ‘‘निधी पुरवणे हे सरकारचे काम आहे. याबरोबरच तुम्ही एका व्यावसायिक खेळाडूसारखे वागले पाहिजे. तुमच्या व्यवस्थापक किंवा प्रशिक्षकाने तुमचे वेळापत्रक, सराव, प्रवास यांसारख्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. क्रमवारीत अव्वल १० ते २० मध्ये असणाऱ्या खेळाडूंना जागतिक स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रणसुद्धा दिले जाते.’’

‘‘उदयोन्मुख खेळाडूंकडेसुद्धा आतापासूनच लक्ष पुरवले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यातील व प्रमुख खेळाडूंमधील दरी कमी होईल. तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतेही राज्य सरकार तयार होत नाही, कारण यासाठी भरपूर खर्च करावा लागतो,’’ अशी खंत अंजूने या वेळी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian athletes to participate in world athletics competition says anju bobby george

ताज्या बातम्या