मार्किस किडो आणि पिआ बर्नाडेथ या भावाबहिणींच्या जोडीच्या अफलातुन खेळाच्या आधारे अवध वॉरियर्सने पहिल्यावहिल्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. चौथ्या लढती अखेर मुंबई मास्टर्स आणि अवध वॉरियर्स यांच्यातला मुकाबला २-२ असा बरोबरीत होता. अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी दोन्ही संघांना एका विजयाची आवश्यकता होती. त्यावेळी मिश्र दुहेरीच्या लढतीत अवध वॉरियर्सच्या मार्किस किडो आणि पिआ बर्नाडेथ जोडीने मुंबई मास्टर्सच्या व्लादिमीर इव्हानोव्ह-टायने बून या जोडीवर २१-१९, २१-१५ अशी मात करत संघाला ३-२ अशा फरकाने अंतिम फेरी गाठून दिली. शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत हैदराबाद हॉटशॉट्स आणि अधव वॉरियर्स यांच्यात लढत होईल.
तत्पूर्वी, सलामीच्या लढतीत आपण जागतिक क्रमवारीत अव्वल का आहोत हे ली चोंग वेईने सप्रमाण सिद्ध केले. अवधच्या आरएमव्ही गुरुसाईदत्तवर २१-१५, २१-७ अशी सहज मात करत लीने मुंबईला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. दुखापतीतून सावरत भारतात आलेल्या लीने आतापर्यंतच्या लढतीत विजय साकारला आहे. ताकदवान स्मॅशचा प्रभावी वापर, नेटजवळून केलेला अचूक खेळ, कमीत कमी चुका हे लीच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले… स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या गुरुसाईदत्तचा लीच्या झंझावातासमोर टिकाव लागला नाही. या विजयासह मुंबईने १-० आघाडी घेतली. दुसऱ्या लढतीत अवध वॉरियर्सची आयकॉन खेळाडू असलेल्या पी.व्ही.सिंधूने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. सिंधूने तीनवेळा ऑल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या अनुभवी टायने बूनवर २१-१६, २१-१३ अशी सरळ गेम्समध्ये मात करत बरोबरी केली. सिंधूने प्रदीर्घ रॅलींवर भर देत बूनला दमवले. स्मॅशेसच्या जोडीला क्रॉसकोर्ट, ड्रॉप आणि नेटजवळूनही सुरेख खेळ करत सिंधूने बूनवर वर्चस्व गाजवले. पुरुष दुहेरी हे अवध वॉरियर्सचे बलस्थान याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला. मार्किस किडो आणि मॅथिअस बो जोडीने मुंबईच्या सुमीत रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा जोडीला २१-१५, २१-१० असे सहज नमवत अवधला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या लढतीत मुंबईचा हरहुन्नरी खेळाडू व्लादिमीर इव्हानोव्हने आपली उपयुक्तता सिद्ध केली. इव्हानोव्ह आणि अवधचा कदंबी श्रीकांत यांच्यात जोरदार मुकाबला रंगला. दोघांनीही सर्वोत्तम खेळाचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी दोघांच्या हातून वारंवार चुका झाल्याने मुकाबला अटीतटीचा झाला. पहिला गेम अवघा एका गुणाने जिंकणाऱ्या व्लादिमीरने दुसऱ्या गेममध्येही निसटता विजय मिळवला. व्लादिमीरने श्रीकांतवर २१-२०, २१-१९ अशी मात केली. व्लादिमीरच्या विजयासह मुंबईने २-२ अशी बरोबरी केली.