२०१९ विश्वचषक स्पर्धेत आपलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. ३ ऑगस्टपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधलं वातावरण तणावाचं झालं होतं. निर्णय प्रक्रियेत विराट-रोहित यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र भारतीय संघात, प्रत्येक खेळाडूला ड्रेसिंग रुममध्ये आपलं मत मांडण्याची मुभा असते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – आपलं कोण, परकं कोण?? एक पराभव तुम्हाला खूप शिकवतो – विराट कोहली

विराट कोहलीने यावेळी भारतीय संघातील नवोदीत खेळाडूंचं कौतुक केलं. “ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यासारखे खेळाडू खूप प्रतिभावान आहेत. १९-२० व्या वर्षात हे खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात, तसं आम्हालाही जमलं नव्हतं. आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे या खेळाडूंना चांगला अनुभव आणि आत्मविश्वास मिळतो. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपल्या देशाचं नेतृत्व करत आहोत ही भावना मनात कायम राहिली पाहिजे.”

यदा-कदाचित या खेळाडूंच्या हातून चुक झाली तरीही त्यांना मी मित्राच्या भावनेतून समजावतो. ड्रेसिंग रुममध्ये आता कोणालाही ओरडलं जात नाही. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंह धोनी मी प्रत्येक खेळाडूशी मित्र म्हणूनच संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मी केलेली चूक तुम्ही करु नका, तुमची कारकिर्द घडवण्याचा हाच काळ आहे. तू सध्या चुकीच्या रस्त्यावर आहेस, अशा शब्दांत युवा खेळाडूंशी बोललो की त्यांनाही बरं वाटतं. कठीण काळात मी प्रत्येकाला चुक सुधारण्याचा वेळ देतो. विराट ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होता.