आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीवरून चाहते निराश आहेत. या स्पर्धेत भारताला दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला. सुपर फोरच्या सामन्यात भारताचा पहिल्यांदा पाकिस्तान तर दुसऱ्यांदा श्रीलंकेकडून पराभव सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाला सामारे जावं लागत आहे. भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंगला समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतं आहे. त्यात आता एका चाहत्याने अर्शदीपला मैदानाबाहेर पडताना गद्दार म्हणल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत भारतीय खेळाडू बसमध्ये बसताना दिसत आहे. तेव्हा अर्शदीप बसजवळ आल्यावर तिथे उभे असलेल्या एका चाहत्याने ‘बघा गद्दार आला’ अशी टिप्पणी केली. अर्शदीप सिंगने हे शब्द ऐकले आणि गद्दार बोलणाऱ्याकडे रोखून पाहिलं. तेव्हा बसजवळ उभे असलेल्या एका भारतीय पत्रकाराने गद्दार उच्चारणाऱ्याला खडेबोल सुनावले.

दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अटीतटीची लढत होत असताना अर्शदीप सिंगने महत्त्वाचा झेल सोडला होता. त्यानंतर याच झेलमुळे भारताचा पराभव झाला, असा दावा सोशल मीडियावर केला गेला. याच कारणामुळे अर्शदीपला खलिस्तानी म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराट कोहली, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग तसेच अन्य दिग्गज त्याला पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते.

“अर्शदीप सिंग मेहनत करत राहा”

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेदेखील अर्शदीप सिंगची पाठराखण केली आहे. “प्रत्येक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याच्यात असलेले सर्वोत्तम देता असतो. त्यामुळे खेळाडूंना सातत्याने पाठिंब्याची गरज असते. खेळामध्ये कधी विजय होतो तर कधी पराभवाला सामोरे जावे लागते. क्रिकेट तसेच अन्य खेळांना वैयक्तिक हल्ल्यांपासून दूर ठेवुया. अर्शदीप सिंग मेहनत करत राहा.”