तीन वर्षे भारतात रंगलेला ‘व्रूम-धूम’चा थरार पुढील वर्षीही वेगाच्या चाहत्यांना अनुभवता येणार नाही. २०१५ मोसमाच्या फॉम्र्युला-वनच्या वेळापत्रकातून सलग दुसऱ्या वर्षी इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीला डच्चू देण्यात आला आहे. पुढील मोसमात एकूण २० शर्यती होणार असून मेक्सिको शर्यतीला या वेळापत्रकात स्थान देण्यात आले आहे.
२०११ ते २०१४ या काळात भारतात तीन वर्षे फॉम्र्युला-वन शर्यत रंगली होती. पण करसवलतीबाबतची केंद्र सरकारची आडमुठी भूमिका आणि पदाधिकाऱ्यांना व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे संघमालकांनी भारतात शर्यत आयोजित करण्याविषयी आक्षेप घेतला होता. संयोजक जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलला या सर्व बाबी दूर करण्यात अपयश आल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भारतात फॉम्र्युला-वन शर्यत होऊ शकणार नाही. जेपी स्पोर्ट्सचा आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाशी (फिया) २०१५ पर्यंत करार आहे.
२०१२च्या मोसमात २० शर्यती झाल्या होत्या. पण काही संघांनी शर्यतींच्या संख्येबाबत आक्षेप घेतल्यामुळे पुढील दोन वर्षे शर्यतींची संख्या १९ ठेवण्यात आली होती. पुढील मोसमात २० शर्यती होणार असल्या तरी न्यू जर्सी शर्यतीला स्थान मिळू शकले नाही. ५ मार्च रोजी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीद्वारे फॉम्र्युला-वनच्या पुढील मोसमाला सुरुवात होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी अबू धाबी शर्यतीद्वारे मोसमाचा समारोप होणार आहे.