बदल हा निसर्गाचा स्थायीभाव असतो. आता सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर पुढे काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भगदाड पडलेल्या भारतीय संघाला सचिनच्या निवृत्तीने झटका दिला आहे. सध्या फॉम्र्युला-वनमध्येही स्थित्यंतराचे वारे वाहू लागले आहे. मायकेल शूमाकरनंतर आता मार्क वेबर आणि प्रेडो डे ला रोसा यांच्या निवृत्तीने फॉम्र्युला-वनमध्ये महान ड्रायव्हर्सची पोकळी निर्माण होणार आहे. पण कुणाच्या येण्याने आणि जाण्याने काही फरक पडत नाही, असे म्हणतात त्याप्रमाणे या दिग्गज ड्रायव्हर्सचा वारसा अखंड चालू ठेवण्यासाठी अनेक युवा ड्रायव्हर पुढे सरसावले आहेत.
एका शर्यतीला शरीरातील बरीच ऊर्जा घटत असते. साधारणत: किमान तीन किलो वजन एका शर्यतीला कमी होत असते. त्यामुळेच फॉम्र्युला-वन ड्रायव्हरची कारकीर्द ही ३०व्या वर्षांपर्यंतच मर्यादित असू शकते. आतापर्यंत रेड बुलला गतवैभव प्राप्त करून देण्यात सेबॅस्टियन वेटेलचा जितका वाटा आहे, तितकाच वाटा मार्क वेबरचाही आहे. पात्रता शर्यतीत एखाद्या संघाच्या दोन्ही ड्रायव्हर्सनी पहिल्या दोन क्रमांकावर मजल मारली की जेतेपद त्यांचेच, असेच समीकरण असते. एकाने सुसाट वेगाने पुढे निघून जायचे आणि दुसऱ्याने मागे असलेल्या कारना पुढे जाऊ न देण्याची जबाबदारी उचलायची, या रणनीतीच्या आधारावर पोल पोझिशन पटकावणारा संघ बाजी मारत असतो. वेटेल फॉम्र्युला-वनचे विश्वविजेतेपद मिळवणारा सर्वात युवा ड्रायव्हर ठरणार असला तरी त्याचा सहकारी वेबर मात्र पुढील वर्षीपासून दिसणार नाही. वेटेलशी खटके उडू लागल्यामुळे ३७ वर्षीय वेबरने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्याची जागा घेण्यासाठी आता टोरो रोस्सो संघाचा डॅनियल रिकाडरे आणि सौबेरचा निको हल्केनबर्ग उत्सुक आहेत.
कमी अर्थव्यवस्था असलेल्या लोट्स रेनॉ संघाने या मोसमात सर्वानाच प्रभावित केले असून, त्यांच्या यशात किमी रायकोनेन आणि रोमेन ग्रॉसजेन यांनी मोलाचा वाट उचलला आहे. फॉम्र्युला-वनमध्ये त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे बोलले जात आहे. २०१२च्या मोसमानंतर निवृत्त झालेल्या शूमाकरची जागा माजी विश्वविजेत्या लुइस हॅमिल्टनने घेतली. पण गुणवत्ता असूनही त्याला भरीव कामगिरी करता आली नाही. निको रोसबर्ग हा युवा ड्रायव्हर त्याला साथ देत आहे. फेरारीकडे अमाप पैसा असूनही फर्नाडो अलोन्सो आणि फेलिपे मासा हे जुनेजाणते ड्रायव्हर त्यांना सांघिक अजिंक्यपद (कंस्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप) मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. अलोन्सोने वेटेलला टक्कर दिली असली तरी मासा याला काढून टाकण्याच्या विचारात फेरारी विचार करत आहे. फोर्स इंडियाची मदारही बुजुर्ग एड्रियन सुटील आणि युवा पॉल डी रेस्टा यांच्यावर आहे. सुटीलचा पत्ता केव्हाही कट होऊ शकतो. २०११च्या मोसमापर्यंत करुण चंडोक आणि नारायण कार्तिकेयन हे भारतीय ड्रायव्हर्स फॉम्र्युला-वनचा भाग होते. आता फॉम्र्युला-वनपर्यंत मजल मारू शकेल, असा एकही ड्रायव्हर भारताने तयार केला नाही. पुढील काही काळात मासा, अलोन्सो, रायकोनेन, हॅमिल्टन आणि सुटील यांच्यासारखे अनेक प्रतिभावान बुजुर्ग ड्रायव्हर निवृत्त होतील. पण त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी युवा पिढीही फॉम्र्युला-वनमध्ये सज्ज आहे.