मार्गात अनेक अडथळे असले तरी आशिया चषक स्पर्धेद्वारे भारतीय हॉकी संघ जागतिक स्पर्धेसाठी पात्र होईल, अशी आशा भारताचा माजी कर्णधार विरेन रस्किन्हा याने व्यक्त केली.
तो म्हणाला, ‘‘ड्रॅग-फ्लिकर्सच्या कामगिरीवर भारताचे यश अवलंबून आहे. आशिया चषकामध्ये बरेच बलाढय़ संघ आहेत. मात्र जागतिक हॉकी लीगमध्ये केलेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी भारताला करावी लागणार आहे. भारतीय संघात अनेक चांगले ड्रॅग-फ्लिकर्स आहेत. पण त्यांना जागतिक हॉकी लीगमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेद्वारे जागतिक स्पर्धेकरिता पात्र होण्याची संधी दवडल्यामुळे भारतापुढील आव्हान खडतर बनले आहे. पाकिस्तान, कोरिया, चीन, जपान आणि मलेशिया या संघांचे आव्हान भारताला पेलावे लागणार आहे.’’