इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अपेक्षांच्या ओझ्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी दाखविता आली नाही, असे स्पष्टीकरण भारताचा माजी सलामीवीर डब्ल्यू. व्ही. रामन यांनी दिले. इंग्लंडने दुसरी कसोटी १० विकेट राखून जिंकत मालिकेत १-१ अशी आघाडी घेतली होती.
‘‘फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फिरकी त्रिमूर्तीकडून मोठय़ा अपेक्षा करण्यात येत होत्या. अपेक्षांचे हेच दडपण या गोलंदाजांवर आले,’’ असे मत बंगालचे प्रशिक्षक रामन यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर सांगितले.‘‘धावफलकावर धावांचा अभाव जाणवल्यामुळे हे दडपण अधिक वाढले. अ‍ॅलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन यांची भागीदारी भारतासाठी आव्हानात्मक ठरली. याचप्रमाणे भारताला धावफलकावर अधिक धावसंख्या उभारणे आवश्यक होते,’’ असे रामन यांनी सांगितले.