वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले.
‘‘इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनी ही मालिका जिंकणे हा योग्यच निकाल होता. विशेषत: त्यांच्या गोलंदाजांनी प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ नक्कीच प्रबळ दावेदार आहे,’’ असे आफ्रिदीने ‘ट्वीट’मध्ये लिहिले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
त्याचप्रमाणे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताला नमवणे अन्य संघांना आव्हानात्मक ठरेल, असे इंग्लंडचा माजी फिरकीपटू अॅश्ले जाइल्सला वाटते. ‘‘भारताचा ट्वेन्टी-२० संघ अत्यंत मजबूत वाटतो आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या सामन्यात बरेच बदल केले. मात्र, निकाल त्यांच्या बाजूनेच लागला. त्यांच्याकडे गोलंदाजांचे वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत,’’ असे जाइल्सने नमूद केले.