क्रिकेट सल्लागार समितीवर अप्रत्यक्षरीत्या दडपण आणण्याची क्लृप्ती
आपल्या सहकाऱ्याची एका पदावर नियुक्ती करण्यासाठी काय आणि कशी क्लृप्ती लढवावी, हे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सध्याच्या घडीला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले जात आहेत. निवडीसाठी उमेदवारांची मुलाखत होण्यापूर्वीच गावस्कर यांनी प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांनाच पसंती दिली जाईल, असे मत व्यक्त करून बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर अप्रत्यक्षरीत्या दडपण आणण्याचे काम केले आहे.
‘इंग्लंडमध्ये २०१४ साली भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. त्यामधून संघाला बाहेर काढून त्यांना यशाचा मार्ग दाखवण्याचे काम रवीने यापूर्वी केले आहे. संघाचे संचालकपद सांभाळल्यानंतर कमी कालावधीमध्ये रवीने संघात आमूलाग्र बदल घडवला होता. सध्याच्या घडीला रवीने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे आणि या पदासाठी कदाचित त्यालाच संधी देण्यात येईल,’ असे गावस्कर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
शास्त्री यांनी ऑगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीसाठी भारतीय संघाचे संचालकपद सांभाळले होते. या कालावधीमध्ये शास्त्री यांनी संघातील खेळाडूंशी आणि खासकरून कर्णधार विराट कोहलीशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. शास्त्री संचालक असताना भारताने इंग्लंडवर एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला होता. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघांवरही विजय मिळवले होते.