भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला.

या सामन्यात भारताच्या संघाचा यष्टिरक्षक असणारा वृद्धिमान साहा याच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीची चाचणी केल्यावर बोटाला फ्रॅक्चर असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्या बोटावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईच्या एका रूग्णालयात मंगळवारी त्याच्या बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहीती बीसीसीआयकडून देण्यात आली.

दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव केवळ १०६ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार शतक ठोकत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात देखील खराब कामगिरी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंतच भारताने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. सलामीवीर शदमन इस्लाम (०) आणि इमरूल कयास (५) दोघे स्वस्तात बाद झाले. कर्णधार मोमिनुल हक शून्यावर माघारी परतला. मोहम्मद मिथून देखील पाठोपाठ ६ धावांवर माघारी परतला. मोहम्मदुल्लाह रिटायर्ड हर्ट झाला. त्याने ७ चौकारांसह ३९ धावा केल्या होत्या. नंतर मेहिदी हसन मिराजदेखील (१५) बाद झाला. मुश्फिकूर रहीमने याने मात्र एक बाजू लावून धरली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर तैजूल इस्लाम आणि एबादत हुसेन हे दोघे झटपट बाद झाले आहेत. मुश्फिकूर रहीमने अर्धशतक ठोकले, पण तो ७४ धावांवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १३ चौकार लगावले. अल-अमीन हुसेन याने ५ चौकार खेचत काही काळ मनोरंजन केले, पण अखेर तो झेलबाद झाला.