विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा

प्रतिभावान आक्रमणपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीचे भारतीय फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. मात्र बचावफळीतील आधारस्तंभ संदेश झिंगणला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनी शनिवारी विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा २३ खेळाडूंचा चमू जाहीर केला.

सप्टेंबर महिन्यात आशियाई विजेत्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखणाऱ्या भारताचा मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी सामना होणार आहे. कोलकाता येथील व्हीवायबीके स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. तापामुळे कतारविरुद्धच्या सामन्याला मुकणारा छेत्रीच्या पुनरागमनाने भारताची बाजू बळकट झाली असली तरी, संदेशव्यतिरिक्त अन्वर अलीनेसुद्धा दुखापतीमुळे माघार घेतल्याने काहीसी चिंताही वाढली आहे. संदेशच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून लवकरच त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान सहा महिने तो कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय चमू

सुनील छेत्री, गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, कमलजित सिंग, प्रीतम कोटल, राहुल भेके, आदिल खान, नरेंदर, सार्थक गोलुई, अनास एडाथोडिका, मंदार राव देसाई, सुभाषिश बोस, उदांता सिंग, निखिल पुजारी, विनित राय, अनिरुद्ध थापा, अब्दुल सहल, रेनिर फर्नाडिस, ब्रँडन फर्नाडिस, लालिनझुआला चॅग्नेट, आशिक कुरुनियान, बलवंत सिग आणि मनविर सिंग.