ध्रुव-सिक्कीचीही आगेकूच; साईप्रणीत, कश्यपचे आव्हान संपुष्टात

बाली : भारताचे बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अभियानाला बुधवारी प्रारंभ केला. परंतु बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले.

श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७१व्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हचा एक तास, १५ चाललेल्या सामन्यात २१-१८,१५-२१, २१-१६ असा पराभव केला. प्रणॉयने मलेशियाच्या लीव डॅरेनला २२-२०, २१-१९ असे नामोहरम केले. जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असलेल्या साईप्रणीतने इंडोनेशियाच्या शेसार रुस्टाव्हिटोविरुद्ध २१-१६, १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली. माजी राष्ट्रकुल विजेत्या कश्यपने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या प्रवीण जॉर्डन आणि मेलाटी ओक्टाव्हियांटीवर २१-११, २२-२० असा विजय मिळवला. बी. सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना इंडोनेशियाच्या हाफीज फैझल आणि ग्लोरिया विडजाजा जोडीने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले.