महाराष्ट्राच्या लाल मातीत जन्म घेणारा प्रत्येक पैलवान हा महाराष्ट्र केसरी किताबाचे स्वप्न पाहत असतो. हा किताब मिळविण्यासाठी भरपूर स्पर्धा असते व हा किताब मिळविल्यानंतर पैलवानास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. त्यामुळेच येनकेनप्रकारेण हा किताब कसा मिळविता येईल अशी वृत्ती अनेक मल्लांमध्ये दिसून येते. या वृत्तीमधूनच केसरीपदास काळिमा फासल्या जाणाऱ्या घटना घडतात. नागपूर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनात यंदा मल्लांची उत्तेजक चाचणी घ्यावी अशी मागणी अनेकांकडून केली जात होती. काहीशा अनिच्छेनेच कुस्ती संघटकांनी उत्तेजक चाचणी घेतली जाणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात ही चाचणी होण्यापूर्वीच दोन युवा मल्लांना उत्तेजकाच्या इंजेक्शन्ससह संयोजकांनी पकडले. या घटनेमुळेच केसरी अधिवेशनात यापूर्वी सर्रास उत्तेजक घेत पैलवान भाग घेत होते की काय, अशी शंका आल्यास नवल वाटणार नाही. केवळ उत्तेजक नव्हे तर लढतीचा निकाल निश्चित करणे, प्रतिस्पर्धी मल्लावर पराभव स्वीकारण्यासाठी दडपण आणणे, कधी कधी पंचांवरही दडपण आणणे, पंचांचा निकाल विरोधात गेल्यानंतर गोंधळ घालणे अशा अनेक घटना या अधिवेशनात घडत असतात.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत साधारणपणे चारशेहून अधिक मल्ल सहभागी होत असतात. एका खेळाडूची उत्तेजक चाचणी घेण्यासाठी साधारणपणे १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. हा खर्च करणे स्पर्धा संयोजकांच्या आवाक्याबाहेरचे असल्यामुळे आजपर्यंत अशी उत्तेजक चाचणी घेण्याचे धाडस कोणीही केलेले नाही. या स्पर्धेतून खुल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड केली जात नसल्यामुळे उत्तेजकाबाबत फारसे कोणी गांभीर्याने पाहिलेले नाही. मुळातच केसरीपदासाठी होणाऱ्या पहिल्या फेरीपासूनच सहभागी खेळाडूंचे अनेक पाठीराखे संयोजन समितीत किंवा महाराष्ट्र कुस्ती परिषदेशी संबंधित असल्यामुळे स्वत:हून कोणी विस्तवास जवळ करीत नाही.

केसरीपदासाठी गादी व माती विभागातील विजेता खेळाडू पात्र ठरतो. अनेक वेळा असे दिसून येते की, पात्र ठरलेले खेळाडू लढतीच्या दिवशी सकाळी गुप्त ठिकाणी लपून बसतात. आपल्या प्रतिस्पर्धी मल्लांच्या पाठीराख्यांनी आपल्यावर दडपण आणू नये यासाठी ते आपला ठावठिकाणा कोणाला सांगत नाहीत.

मॅचफिक्सिंग प्रकार कुस्तीमध्येही दिसून येतो. राज्यामध्ये अनेक ठिकाणी कुस्ती मैदाने भरवली जातात. पूर्वी या लढतींमधील खेळाडूला त्या गावचा केसरी किंवा तालुका केसरीपदाने भूषविले जात असे. अशा ठिकठिकाणच्या केसरीपदांमुळे महाराष्ट्र केसरी किताबाचे अवमूल्यन होऊ लागले. त्यामुळे गतवर्षी कुस्ती परिषदेने ठराव करीत अन्य कोणत्याही स्पर्धामध्ये केसरीपद देऊ नये असा ठराव करीत नियमाची अंमलबजावणी केली.

अनेक वेळा रोख पारितोषिकांच्या कुस्तीच्या वेळी प्रतिस्पर्धी मल्लांमध्ये लढतीपूर्वीच आर्थिक देवाणघेवाण निश्चित केली जाते व लढतीत कोण पराभूत व्हायचे हेदेखील निश्चित केले जाते.

केसरीपदासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत मल्लांनी त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतास कुस्तीचे पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राच्या मातीतूनच जन्माला आले. हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने, श्रीपती खचनाळे, गणपतराव आंदळकर असे नामांकित मल्ल महाराष्ट्राने आपल्या देशास दिले आहेत. याचाच विसर हल्लीच्या मल्लांना पडत चालला आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. भ्रष्ट व लाचार वृत्तीच्या काही मल्लांमुळे लाल मातीचाच अवमान झाला आहे.

उत्तेजक केव्हा घेतात?

या स्पर्धेसाठी खेळाडूंचे वजन स्पर्धेच्या दिवशी सकाळी घेतले जाते. अनेक पैलवान वजन चाचणीपूर्वी काही तास काहीही खात नाहीत. वजन चाचणी झाली की लगेचच ते केळी व भरपूर आहार घेत आपले वजन वाढवतात. या चाचणीच्या आदल्या दिवशी उत्तेजकाचे इंजेक्शन घेतले तरी त्याचा लगेचच वजनावर परिणाम होत नसतो. साधारणपणे पंधरा तासांनंतर त्याचा फायदा सुरू होतो. हे लक्षात घेऊन खेळाडू वजन चाचणीपूर्वी ८-१०तास आधी अशी इंजेक्शन्स घेतात.

milind.dhamdhere@expressindia.com