फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचा फिव्हर भारतातही चढू लागला आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तो अधिक जाणवतोय. १३ जुलैच्या अंतिम सामन्यावर अनेकांची नजर आहे. हा अंतिम सामना कोणत्या संघांत होईल, यावरही मोठय़ा प्रमाणात सट्टा लावण्यात आला आहे. अर्थात ब्राझीललाच अधिक पसंती असून त्याखालोखाल जर्मनी आणि अर्जेटिना या संघांना मान मिळतो. मात्र यंदाचा विश्वचषक ब्राझील पुन्हा पटकावणारच, असा ठाम विश्वास सट्टेबाजांचा आहे. यंदा भारतातील सट्टाबाजारात तब्बल हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा एक अंदाज आहे. या अंदाजाला काहीएक अर्थ नसतो, असे अनेक मान्यवर मंडळींचे म्हणणे आहे. सांकेतिक भाषेत पंटर्स संभाषण करीत असले तरी तो व्यवहार लाख किंवा कोटीमध्येच असतो, असे सूत्रांनी सांगितले. विश्वचषक सुरू झाला, तेव्हा स्पेनचा बोलबाला होता. आता स्पेनचे नामोनिशाणच मिटले गेले आहे, तर नेदरलँड्सच्या प्रगतीची दखल घेतली जात आहे. आज जरी पारडे ब्राझीलच्या बाजूने असले तरी खरी कल्पना उपांत्य फेरीत कोण पोहोचतो, यावर अवलंबून आहे.
आजचा भाव :
उपांत्यपूर्व फेरी :
४ जुलै
फ्रान्स                      जर्मनी
दोन रुपये (११/५)    ४५ पैसे (६/४)
ब्राझील                    कोलंबिया
३५ पैसे (११/१३)     साडेतीन रुपये (१५/४)
५ जुलै
नेदरलँड्स                कोस्टा रिका
 ५५ पैसे (१/२)        पाच रुपये (७/१)

अन् त्याने पराभवाचे चित्रच पाठीवर कोरले!
विश्वचषकातील पराभव हा कोणत्याही खेळाडूसाठी जिव्हारी लागणारा असाच असतो. चिलीने बाद फेरीत यजमान ब्राझीलला चांगलेच झुंजवले होते. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला होता. अतिरिक्त वेळेचा खेळ संपण्याआधी चिलीच्या मॉरिसियो पिनिला याने मारलेला फटका गोलबारला लागून बाहेर गेला होता. हा गोल झाला असता तर चिलीने बलाढय़ ब्राझीलला घरचा रस्ता दाखवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले असते आणि पिनिला क्षणार्धात चिलीसाठी हिरो ठरला असता. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. अखेर पेनल्टी-शूटआऊटमध्ये चिलीने हा सामना गमावला. पण आपला गोल हुकल्याचे शल्य पिनिलाला बोचत होते. तो क्षण आयुष्यभर आठवण्यासाठी पिनिलाने आपल्या पाठीवर त्या क्षणाचा टॅटू आपल्या पाठीवर कोरला आहे. ‘विजयापासून एक सेंटीमीटरने दूर’ असे वाक्यही त्याने पाठीवर लिहिले आहे. पिनिलाच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. पण त्यापैकी हा वेगळा टॅटू सहज लक्ष वेधून घेतो.

भिंतीवरी मेस्सी असावा!
विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचा ज्वर आता जगभरात भिनू लागला आहे. इंडोनेशियासारख्या देशातसुद्धा फुटबॉल खेळावर लोक जीवापाड प्रेम करतात. पूर्व जावा येथील जतिरेजो गावातील एका घराच्या भिंती मेस्सीच्या चित्राने उजळून निघाल्या आहेत.

गोलमीटर
सर्वाधिक गोल करणारे खेळाडू
खेळाडू                            देश        गोल
जेम्स रॉड्रिगेझ            कोलंबिया    ५
लिओनेल मेस्सी          अर्जेटिना     ४
नेयमार                       ब्राझील        ४
थॉमस म्युलर               जर्मनी        ४
इनेर व्हॅलेंसिया             इक्वेडोर      ३
करिम बेंझेमा               फ्रान्स          ३
रॉबिन व्हॅन पर्सी          नेदरलँड्स     ३
आर्येन रॉबेन                नेदरलँड्स     ३
झेरदार शकिरी            स्वित्र्झलड     ३