सुशील कुमार, भारतीय शालेय क्रीडा महासंघाचा अध्यक्ष

ऋषिकेश बामणे

मुंबई : देशाच्या कानाकोपऱ्यातून शालेय स्तरावरील गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन योग्य प्रशिक्षणाद्वारे त्यांचे ऑलिम्पिक पदकविजेत्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया भारतीय शालेय क्रीडा महासंघाचा (एसजीएफआय) अध्यक्ष आणि कुस्तीपटू सुशील कुमारने व्यक्त केली.

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या ३७ वर्षीय सुशीलची काही दिवसांपूर्वीच भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली. भविष्यात शालेय पातळीपासूनच भारताला ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू लाभावे, तसेच खेळाडूंनी गैरमार्गाचा वापर न करता कामगिरीच्या बळावरच प्रगती करावी, या हेतूने सुशीलच्या अध्यक्षतेखालील महासंघ कार्यरत असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारविजेत्या सुशीलशी केलेली ही खास बातचीत.

* महासंघाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यामुळे आगामी आव्हानांकडे कशा प्रकारे पाहत आहेस?

शालेय क्रीडा स्पर्धांच्या उन्नतीसाठी मी पुन्हा एकदा स्वत:चे १०० टक्के योगदान देईन. येत्या काही वर्षांत शालेय पातळीवरील क्रीडा स्पर्धांना प्रगतिपथावर नेण्यासाठी आम्ही आराखडा तयार केला आहे. क्रीडा मंत्रालयाकडून यासंबंधी संमती मिळाल्यावर लगेचच आम्ही त्यावर अंमलबजावणी करू. त्याशिवाय करोना साथीच्या फैलावामुळे आता क्रीडा क्षेत्रावर अनेक बंधने आले आहेत. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांचा विकास कसा करता येईल, यावरही आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.

* शालेय पातळीवरील कारभारात अनेकदा सुस्पष्टता नसते, असे म्हटले जाते. त्याविषयी तुला काय वाटते?

शालेय पातळीवरील स्पर्धांमध्ये वयचोरीचे प्रकार आढळण्याची संख्या आता फारच कमी झाली आहे. त्याशिवाय कोणत्याही क्रीडपटूला फक्त त्याच्या कामगिरीच्या बळावरच एखाद्या संघात स्थान मिळावे, कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून त्याने पात्र खेळाडूचा हक्क हिरावू नये, याची पडताळणी करण्यासाठी खास समिती नेमण्यात आली आहे. खेड्यापाड्यांतून आलेल्या खेळाडूंना अनेकदा अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला बळी पडावे लागते. या गोष्टींना आळा घालण्याऐवजी वैयक्तिक लाभासाठी घोळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर क्रीडा मंत्रालयाकडूनच कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शालेय पातळीवरील स्पर्धांच्या कारभारात आता पूर्णपणे पारदर्शकता दिसून येते.

* तू स्वत: एक क्रीडापटू असल्याने तुझ्या अनुभवाचा लाभ या कार्यासाठी कशा प्रकारे होईल?

मला स्वत:ला शालेय पातळीवर कुस्ती खेळताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्याच्या पिढीतील मुला-मुलींना कोणत्याही सुविधांचा अभाव पडता कामा नये, याची मी संपूर्ण काळजी घेत आहे. एक खेळाडू या नात्याने कोणत्याही खेळाडूशी संवाद साधण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी मी सदैव उपलब्ध असेन.

* ऑलिम्पिकमधील खेळ तसेच खेळाडूंवर विशेष लक्ष पुरवण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येणार आहे?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या दृष्टीने आम्ही तयारीला प्रारंभ केला आहे. त्यासाठी ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या खेळांतील क्रीडापटूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा तसेच विविध खेळांच्या लीगमधून देशाला अनेक उदयोन्मुख खेळाडू गवसले आहेत, परंतु अनेकदा त्यांना पुढे योग्य प्रशिक्षण न लाभल्याने त्यांचा विकास थांबतो. म्हणून अशा खेळाडूंसाठी देशविदेशातील अनुभवी प्रशिक्षकांची नेमणूक करण्याला आमचे प्राधान्य आहे, कारण प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची साथ लाभल्यास आपल्याला किशोरवयापासूनच ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू लाभतील. या प्रक्रियेत यशस्वी ठरल्यास पुढील ३-४ वर्षांत भारत ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके कमावू शकेल, याची मला खात्री आहे.