इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेच्या आगामी सत्रात काही बदल होणार असल्याचे संकेत आहेत. सामन्याची वेळ आणि खेळाडूंना संघ बदलण्याची संधी आगामी सत्रात मिळू शकते.  आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार आहे.

या बैठकीत आगामी आयपीएल स्पर्धेमध्ये नाविण्यपूर्ण बदल करण्यासंदर्भात चर्चा देखील केली जाईल. ते म्हणाले की, स्पर्धा सुरु असताना खेळाडूंची अदलाबदल करण्याची कल्पना संघमालकांनी मान्य केली आहे. ही कल्पना प्रत्यक्षात राबवण्यात यश आले तर चांगल्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये खेळण्याची अधिक संधी उपलब्ध होईल, असा विश्वास शुक्ला यांनी व्यक्त केला. यामध्ये खेळाडूंना इंग्लिश प्रीमिअर लीगप्रमाणे स्पर्धेदरम्यान संघ बदलणे शक्य होणार आहे. मात्र, स्पर्धेतील ७ सामन्यामध्ये केवळ दोनवेळा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या खेळाडूंचा विचार करण्यात येईल, अशी अट देखील आहे.

आतापर्यंत आयपीएलचे सामने दुपारी ४ आणि रात्री ८ वाजता खेळवण्यात आले आहेत. आगामी सत्रात वेळेमध्ये बदल होण्याची देखील शक्यता आहे. दुपारी आणि रात्री अशा दोन्ही सत्रातील सामने एक तास अगोदर सुरु करण्याचा प्रस्तावाला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत संघ मालकांनी मंजूरी दिली आहे. मात्र, प्रसारणाचे अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याशिवाय हा बदल होणे अशक्य आहे. रात्रीच्या सत्रातील सामने १२ वाजेपर्यंत सुरु राहतात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग कमी होतो. त्यामुळे हा बदल करण्याचा विचार सुरु आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अनेकदा वेळेतील बदलाची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता गव्हर्निंग काऊन्सिलने हा मुद्दा मान्य केल्यामुळे आगामी काळात वेळेतील बदलाचा सकारात्मक विचार होऊ शकतो.