नवी दिल्ली : देशात आता महिलांचे क्रिकेट खेळण्याचे प्रमाण वाढले असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी महिलांचीसुद्धा किमान सहा संघांची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवण्यात यावी, असे भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने सुचवले आहे.

महाराष्ट्राची २५ वर्षीय डावखुरी फलंदाज स्मृती महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व करते. या स्पर्धेत सध्या तीन संघ खेळतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील संघांमध्ये लवकरच वाढ होईल, अशी आशा स्मृतीने व्यक्त केली.

‘‘पुरुषांच्या ‘आयपीएल’चा दर्जा आज ज्या उंचीवर आहे, तितका १०-१२ वर्षपूर्वी नव्हता. विश्वभरात ‘आयपीएल’ची ख्याती पसरली असून भारताला या स्पर्धेमुळे असंख्य प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत, असे  स्मृती म्हणाली.