आयपीएल स्पर्धेत वेंकटेश अय्यरची चांगलीच चर्चा आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वेंकटेश अय्यरने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर आता मुंबई इंडियन्सविरोधातील त्याने विस्फोटक फलंदाजी केली. अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. वेंकटेश ३० चेंडूत ५३ धावा करून बाद झाला आहे. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. डावखुऱ्या अय्यरची फलंदाजी पाहिली तर आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळतोय, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. वेंकटेश अय्यरला २०२१ च्या पहिल्या टप्प्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी २० लाख रुपय या बेस प्राइसवर त्याला कोलकाताने घेतलं.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि फलंदाजीने छाप सोडली. वेंकटेश अय्यरने २७ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या होत्या.२६ वर्षीय अय्यर मध्यप्रदेशकडून क्रिकेट खेळतो. फलंदाजीसोबत वेंकटेश अय्यर गोलंदाजीही करतो. या खेळाडूनं क्रिकेटसोबत चांगलं शिक्षणातही आपली छाप सोडली आहे. वेंकटेश अय्यर एमबीए पदवीधर आहे. मात्र क्रिकेटसाठी अय्यरनं सीएचं अंतिम वर्ष आणि मल्टिनॅशनल कंपनीची नोकरी सोडली आहे. २०१८ मध्ये वेंकटेश अय्यरला अकाउंटिंग कंपनीत नोकरी मिळाली होती. आईच्या आग्रहानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. वेंकटेशने १९ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

“अकाउंटिंगमध्ये नोकरी करणं म्हणजे वेगवेगळ्या शहरात जावं लागतं. यामुळे माझं क्रिकेट सुटलं असतं. त्यामुळे नोकरी करणं हा पर्याय नव्हता. त्यासाठी मी क्रिकेट क्षेत्र निवडलं. छत्तीसगडविरुद्ध आमचे दोन सराव सामने होते. पहिल्या सामन्यात मी स्वस्तात बाद झालो. दुसरा सामना माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्यावेळी एमबीएच्या इंटरनल परीक्षा सुरु होत्या. तेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो. परीक्षा दिली आणि लगेच निघालो. मैदानावर पोहोचण्यासाठी सिग्नल तोडले आणि कसाबसा मैदानात पोहोचलो. मैदानात गेलो तेव्हा संघाची धावसंख्या ६ गडी बाद ६० धावा होत्या. मी शतक ठोकलं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कॉलेजला गेलो आणि परीक्षा दिली. या सामन्यानंतर माझी रणजी सामन्यात निवड झाली.”, असं वेंकटेश अय्यरने इएसपीएनक्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अय्यरने देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५४५ धावा केल्या आहेत. ९३ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर २४ लिस्ट ए सामन्यात त्याने ८४९ धावा केल्या आहेत. यात त्याची १९८ सर्वोत्तम धावसंख्या आहे.

MI Vs KKR : कोलकात्याचा ७ गडी राखून मुंबई इंडियन्सवर विजय

वेंकटेश अय्यरने एमबीए पूर्ण केलं आहे. आई वडिलांच्या आग्रहानंतर करिअरमध्ये प्लान बी साठी त्याने पदवी मिळवली आहे. या दरम्यान क्रिकेट बरोबर त्याने अभ्यासही केला. वेंकटेश अय्यरला क्रिकेटसोबत कुकिंग करायला आवडतं. तसेच तो रजनीकांतचा चाहता आहे.