करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. भारतातही दर दिवसाला नवीन रुग्ण सापडत आहेत. परिस्तितीचं गांभीर्य लक्षात घेऊन बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर, स्पर्धेच्या भवितव्याबद्दल निर्णय घेतला जाईल. मात्र असं असलं तरीही, काही संघमालक आयपीएल स्पर्धा खेळवण्यासाठी उत्सुक आहेत.
अवश्य वाचा – आयपीएल रद्द झालं तर धोनीचं काय होणार??
“आम्ही परदेशी खेळाडूंना भारतात खेळवण्यासाठी तयार आहोत. भारतात आल्यानंतर त्यांना १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवलं तरीही काही हरकत नाही. सरकारने मान्यता दिली आणि व्हिसाचे सर्व सोपस्कार पार पडले तर हे होऊ शकतं. परदेशी खेळाडूंना १ एप्रिलपर्यंत भारतात आणून त्यांना पुढचे १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवता येऊ शकतं. परंतु यासाठी खेळाडूंना व्हिसा देणं गरजेचं आहे”, आयपीएलमधील एका संघाने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थांना ही माहिती दिली.
अवश्य वाचा – करोनाबद्दल अफवा पसरवू नका, सुरेश रैनाचं चाहत्यांना आवाहन
केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचे नियम कडक केले आहेत. यामुळे परदेशी खेळाडू आयपीएलसाठी भारतात येण्याचा रस्ता कठीण होऊन बसला आहे. याचसोबत युएई, कतार, ओमान यासारख्या देशांमधून परदेशी नागरिकांना भारतात येण्यात बंदी घालण्यात आलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर, स्पर्धा कशी खेळवली जाईल यावर बीसीसीआयचे अधिकारी विचार करत आहेत. मात्र १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आयपीएलचं भवितव्य हे अधांतरी मानलं जात आहे.
