आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन नव्या संघांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आयपीएलच्या प्रशासकीय समितीने गुरूवारी कोलकाता येथे झालेल्या बैठकीत मांडला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) पुढील महिन्यात होणाऱया वार्षिक बैठकीनंतर या दोन नव्या संघांसाठीच्या निविदा मागविल्या जाणार आहेत. तसेच आयपीएलमधील पेचप्रसंगांबाबत प्रशासकीय समितीने दिलेला अहवाल आणि शिफारसींवर चर्चा करून चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचे नव्याने व्यवस्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही समजते.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समतीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला दोन वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबित केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर केला जाईल ही आमची जबाबदारी आहे. स्पर्धेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, आयपीएल स्पर्धा १० संघांनिशी खेळवावी असा हेतू असल्याने चेन्नई, राजस्थानच्या जागी दोन नव्या संघांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आयपीएलच्या प्रशासकीय समितीतील सदस्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, आयपीएल पेचप्रसंगाबाबत राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय समितीने दिलेला अहवाल आणि शिफारशींवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआय कार्यकारिणी समितीची बैठक आज कोलकाता येथे होणार आहे. या बैठकीत या दोन नव्या संघांच्या समावेशाबाबत शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येते. तसेच स्पर्धेचे वेळापत्रक आणि ठिकाण देखील या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे.