जागतिक ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेचा ताज शिरपेचात रोवून ऐतिहासिक १३वे जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या पंकज अडवाणीने इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर स्नूकर आणि बिलियर्डमध्येही लीग शक्य असल्याचे मत व्यक्त केले. चीनच्या यान बिंगटाओचा ६-२ असा पराभव करून अडवाणीने मंगळवारी जागतिक ६-रेड स्नूकर स्पध्रेचे जेतेपद कायम राखले होते. भारतात या खेळाची भरभराट होताना पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. ‘‘आयपीएलच्या धर्तीवर स्नूकर किंवा बिलियर्डची लीग होणे शक्य आहे. दीर्घ काळापासून मी हा खेळ खेळत आहे आणि या खेळातही आर्थिक फायदा आहे. भारतात या खेळाला उज्ज्वल भविष्य आहे. ६-रेड प्रकार लोकांचे लक्ष वेधत आहे,’’ असे मत अडवाणीने व्यक्त केले.