स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, क्रिकेटपटू अजित चंडिला आणि अन्य दोन सट्टेबाजांच्या पोलीस कोठडीमध्ये दिल्ली पोलिसांनी आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. स्पॉट-फिक्सिंगच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी आरोपींच्या चौकशीसाठी कोठडीची आवश्यक असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयात नमूद केले. त्यामुळेच महानगर दंडाधिकारी अनुज अगरवाल यांनी श्रीशांत, चंडिला यांच्यासह सट्टेबाज चंद्रेश पटेल आणि अश्वानी ऊर्फ टिपूला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी केली.
माजी रणजीपटू बाबुराव यादवच्या चौकशीसाठी पोलिसांनी आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. यादवला ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय क्रिकेटपटू अंकित चव्हाण आणि अन्य तीन सट्टेबाज जिजू जनार्दन, दीपक कुमार आणि मनन भट यांनासुद्धा ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौघांच्या आणखी चौकशीची आवश्यकता नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी या नऊ जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला सट्टेबाज मोहम्मद याहया सध्या पोलीस कोठडीत आहे, तर अन्य नऊ आरोपींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
सरकारी वकील राजीव मोहन यांनी सांगितले की, ‘‘श्रीशांतच्या चौकशीत त्याने अभिषेक शुक्लचे नाव घेतले होते. श्रीशांतला अटक झाल्यानंतर त्याच्या अन्य एका हॉटेल रूममधून काही वस्तू हलवण्यासंदर्भातसुद्धा निर्देश दिले गेल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी श्रीशांतला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.’’
श्रीशांत आणि चव्हाण यांचा जामीन अर्ज
दिल्ली : न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांनी जामीन अर्ज सादर केला आणि न्यायालयाने या सुनावणीसाठी २८ मे ही तारीख निश्चित केली आहे. २ जूनला असलेल्या आपल्या विवाहाकरिता अंकितने जामिनाचा अर्ज केला आहे.