मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांची नाराजी

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला ‘डीआरएस’ उपलब्ध नसल्याचा आम्हाला फटका बसला. आम्ही डावाच्या सुरुवातीलाच गडी गमावले. त्यानंतर पुनरागमन करणे आम्हाला शक्य झाले नाही, अशी नाराजी चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेिमग यांनी व्यक्त केली.

चेन्नई आणि मुंबई या संघांमध्ये गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा डाव अवघ्या ९७ धावांत आटोपला आणि मुंबईने हे आव्हान १४.५ षटकांत गाठले. त्यामुळे चेन्नईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. या सामन्याच्या सुरुवातील वानखेडे स्टेडियममधील वीजप्रवाह खंडित झाल्याने चेन्नईला डावातील पहिल्या दहा चेंडूंसाठी ‘डीआरएस’चा वापर करता आला नाही. या दहा चेंडूंमध्ये चेन्नईने पाच धावांतच तीन बळी गमावले होते. मात्र, पंच चिरा रवीकांतरेड्डी आणि ख्रिस गॅफनी यांनी दिलेले काही निर्णय हे प्रश्नांकित होते. 

डावाच्या दुसऱ्या चेंडूवर मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेला पायचीत पकडले. मात्र, चेंडू उजव्या यष्टीबाहेर जात असल्याचे ‘रिप्ले’मध्ये दिसले. पुढच्या षटकात जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर पंच गॅफनी यांनी रॉबिन उथप्पाला पायचीत ठरवले. परंतु पंचांच्या या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

‘‘काही तांत्रिक कारणांमुळे डावाच्या सुरुवातीला ‘डीआरएस’ उपलब्ध नसणे हे आमचे दुर्दैव होते. पंचांच्या निर्णयाने आणि एकंदर परिस्थितीने आम्ही निराश आहोत. मात्र, हा खेळाचा भाग आहे, असे म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच काही निर्णय आमच्या विरोधात गेले. त्यामुळे आमचे नुकसान झाले आणि त्यातून सावरण्यात आम्हाला अपयश आले. मात्र, आम्हीसुद्धा अधिक चांगला खेळ करू शकलो असतो,’’ असे सामन्यानंतर फ्लेिमग म्हणाले.

तिलक लवकरच भारतासाठी खेळेल -रोहित

युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा लवकरच भारतीय संघासाठी खेळेल, असे मत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. ‘‘यंदा ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच खेळत असूनही तिलकने अप्रतिम कामगिरी केली आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही तो संयमाने फलंदाजी करतो. तो लवकरच भारतासाठी खेळेल

याची मला खात्री आहे. तांत्रिकदृष्टय़ा तो सक्षम असून मानसिकदृष्टय़ाही कणखर आहे. सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी आवश्यक सर्व गुण त्याच्यात आहे,’’ असे चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला. तिलकने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये मुंबईकडून सर्वाधिक ३८६ धावा केल्या आहेत.