DC vs GT Match Updates : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४० वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर ४ धावांनी निसटता विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातसमोर २२५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघ ८ बाद २२० धावाच करु शकला.

गुजरातचा दिल्लीविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव –

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ४ गडी गमावून २२४ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने ४३ चेंडूत नाबाद ८८ तर अक्षर पटेलने ६६ धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाला २० षटकं संपल्यानंतर ८ बाद २२० धावाच करता आल्या. गुजरातसाठी डेव्हिड मिलरने २३ चेंडूत ५५ तर साई सुदर्शनने ३९ चेंडूत ६५ धावा केल्या. गुजरातचा दिल्लीविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी अहमदाबादमध्येही दिल्लीने गुजरातविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

शेवटच्या षटकात १९ धावा करायच्या होत्या –

गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावा करायच्या होत्या. राशिद खानने पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन चौकार मारले. त्यानंतर गुजरातला चार चेंडूत केवळ ११ धावांची गरज होती. मात्र त्यानंतर राशिद खानला केवळ सहा धावा करता आल्या. ज्यामुळे २२० धावा केल्यानंतर गुजरातला ४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. राशिद खानने ११ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद २१ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून रसिक सलामने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज

या विजयासह दिल्लीचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आला आहे. त्यांनी नऊपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर गुजरातचा संघ सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी नऊपैकी पाच सामने गमावले असून त्यांचे आठ गुण आहेत. मात्र, नेट रन रेटमध्ये गुजरातचा संघ दिल्लीच्या मागे आहे. दिल्लीचा पुढील सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध २७ एप्रिल रोजी दिल्लीत होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २८ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आपला पुढील सामना खेळणार आहे.