Hardik Pandya to lose 70% property to Natasa Stankovic: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या व्यावसायिक कारणांसह वैयक्तिक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. आयपीएल २०२४ मधील मुंबईच्या खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यातच दुसरीकडे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या संकटात सापडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याच्या संपत्तीतील ७० टक्के संपत्ती ही नताशाच्या नावे होणार आहे, यामुळे हार्दिक पांड्याची आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत. दरम्यान, दोघांनी १४ फेब्रुवारी रोजी एकमेकांबरोबरची शेवटची पोस्ट शेअर केली होती. यात काही दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमात एकत्र दिसले, यानंतर आता दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेत असल्याची चर्चा रंगतेय. यामुळे हार्दिकच्या संपत्तीतही नताशाला ७० टक्के हिस्सा द्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर या संबंधित अनेक पोस्टदेखील व्हायरल होत आहेत.

दरम्यान, सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. आयपीएलमधील मॅच फीसह तो जाहिराती आणि विविध माध्यमांमधून कमाई करतो.

पांड्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा भाग आहे. यासाठी त्याला संघाकडून १५ कोटी रुपयांचे मानधन मिळाले. यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरात संघाकडूनही पांड्याला तेवढीच रक्कम मिळत होती. याचबरोबर त्याला भारतीय क्रिकेट संघाकडून मॅच फीदेखील मिळते. पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. याशिवाय तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. त्यातूनही तो चांगली कमाई करतो. अशाच दोघांच्या घटस्फोटासंदर्भात अनेक टि्वट व्हायरल होत आहेत.

हार्दिक पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने यासाठी ३० कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय त्याचे वडोदरा येथे एक पेंटहाऊस आहे, त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. मात्र, घटस्फोटानंतर पांड्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

मुंबईतील एका क्लबमध्ये हार्दिक आणि नताशा यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हार्दिक करिअरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना नताशाने त्याला मोलाची साथ दिली. जानेवारी २०२० मध्ये, दोघांनी दुबईमध्ये एकमेकांना अंगठी घातली आणि अधिकृतपणे एंगेजमेंट झाली. यानंतर अभिनेत्री नताशा आणि हार्दिकने ३१ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली. यानंतर त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांच्या मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. हार्दिकने स्वत:च सोशल मीडियावरून मुलाच्या जन्माची माहिती दिली होती.