आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच युएईत पार पडला. अंतिम फेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्लने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन युएईत केलं होतं. याचसोबत प्रेक्षकांनाही स्टेडीअममध्ये परवानगी नाकारण्यात आली होती. ज्यामुळे आयपीएल सामने पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येत गेल्या हंगामाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यंदाचा हंगाम हा प्रेक्षकसंख्येचे सर्व विक्रम मोडेल असा अंदाज वर्तवला होता. युएईत स्पर्धेचं आयोजन करण्यासाठीही बीसीसीआयला बरीच वाट पहावी लागली. ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने तेराव्या हंगामाची घोषणा केली. दरम्यानच्या काळात भारत-चीन यांच्यातील सीमावादामुळे बीसीसीआयला VIVO या आपल्या स्पॉन्सर कंपनीचा करार एका वर्षासाठी स्थगित करावा वागला. मात्र यानंतर Dream 11 या App ने तेराव्या हंगामासाठी २२२ कोटी रुपये मोजत स्पॉ़न्सरशिपचे हक्क विकत घेतले.