KKR vs SRH IPL 2024 Final Match Updates: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी तर आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात हाहाकार केला. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचे फलंदाजांना १०० धावा करणंही अवघड झालं होतं. अखेरीस हैदराबादचा संपूर्ण संघ अंतिम सामन्यात अवघ्या ११३ धावांवर ऑल आऊट झाला आहे. संघाचे सर्वच फलंदाज अंतिम सामन्यात फेल ठरले. या ११३ धावांच्या सर्वात कमी धावसंख्येसह सनरायझर्स हैदराबादच्या संघाने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

कोलकाता संघाला तिसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना ११४ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. हैदराबादची सलामीची जोडी पुन्हा एकदा फेल ठरल्याने हैदराबादचा संपूर्ण संघ धावा करण्यात गडबडला. हैदराबादची पहिली विकेट पहिल्या षटकाच्या ५व्या चेंडूवर पडली. सलामीवीर अभिषेक शर्माने २ धावा केल्या. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हैदराबादला दुसरा धक्का बसला. ट्रॅव्हिस हेड गोल्डन डकचा बळी ठरला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हैदराबादचा तिसरा खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुल त्रिपाठीने १३ चेंडूत ९ धावा केल्या. हैदराबादला चौथा धक्का १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बसला. नितीश रेड्डीने १० चेंडूत १३ धावा केल्या. हर्षित राणाने त्याची विकेट घेतली.

११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आणखी एक विकेट हैदराबादने गमावली. एडन माक्ररमने सुरूवातीला काही फटकेबाजी केली पण मोठी धावसंख्या तो उभारू शकला नाही. त्याने २३ चेंडूत २० धावा केल्या. पुढच्याच षटकात शाहबाज अहमदनेही आपली विकेट गमावली. शाहबाज अहमदने ७ चेंडूत ८ धावांची खेळी खेळली. वरुण चक्रवर्तीने त्याला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अब्दुल समद १३व्या षटकात ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. आंद्रे रसेलने त्याला गुरबाजकरवी झेलबाद केले. १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षित राणाने हेनरिक क्लासेनला क्लीन बोल्ड करत हैदराबादच्या सन्मानजनक धावसंख्येच्या आशेवर पाणी फेरले. त्याने १७ चेंडूत १६ धावा केल्या.

१८ व्या षटकात सुनील नारायणने उनाडकटला ४ धावांवर पायचीत केले आणि नववी विकेट मिळवली. पॅट कमिन्सने फलंदाजी करताना एक षटकार लगावला होता, त्यामुळे तो संघाला अजून चांगल्या धावसंख्येपर्यंत नेईल असे वाटले होते, पण आंद्रे रसेलने १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद केले आणि हैदराबादचा संघ ११३ धावांवर ऑल आऊट झाला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट घेतले. तर स्टार्क आणि हर्षित राणाने २ विकेट्स मिळवले. नारायण, चक्रवर्ती आणि वैभव अरोरा यांना १-१ विकेट घेण्यात यश आले.

यासह सनरायझजर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वात कमी धावसंख्या उभारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा सनरायझर्स हैदराबादचा संघ अंतिम फेरीत मात्र मागे पडला. आयपीएल फायनलमधील सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे तर, यापूर्वी २०१३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ बाद १२५ धावा केल्या होत्या. २०१७ च्या फायनलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १२९ धावा करत सामना जिंकला.

आयपीएलच्या अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या
११३ SRH विरुद्ध KKR चेन्नई २०२४ *
१२५/९ CSK वि MI कोलकाता २०१३
१२८/६ RPS वि MI हैदराबाद २०१७
१२९/८ MI वि RPS हैदराबाद २०१७