मुंबई इंडियन्स भलेही आयपीएलमधील चॅम्पियन संघ असेल, पण स्पर्धेत त्यांची सुरुवात नेहमीच पराभवांनी होताना दिसते. सुरुवातीचे सामने जिंकण्यात संघाला नेहमीच अपयश येते. यावेळीही सारखीच परिस्थिती आहे, पण फरक एवढाच आहे की आता कर्णधारपद रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे आहे. चाहत्यांसह अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आधीच वेधून घेतलेला हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून देऊ शकला नाही. राजस्थानविरूद्धच्या या पराभवानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने कोणाचे नाव न घेता निशाणा साधला.

मुंबई आणि राजस्थान सामन्यादरम्यान आणि सामना झाल्यानंतरही इरफान पठाणने एकामागून एक अनेक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने रियान परागच्या फलंदाजीचे मनापासून कौतुक केले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक देण्याच्या निर्णयाचे कारण सांगितले. पण त्याचे सर्वाधिक चर्चेत असलेले ट्विट ते होते ज्यात पठाण कर्णधारपदावर आपले मत मांडत आहे. इरफानने म्हटले, ‘तुमच्या नेत्याने सर्वात कठीण परिस्थितीत कामगिरी करावी असे तुम्हाला नेहमीच वाटते. जर त्याने असे केले नाही तर तो त्याच्या संघाचा मान मिळवू शकणार नाही.’

मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळेसही इरफानने आपले मत बेधडकपणे मांडले होते. त्या सामन्यात २०० किंवा त्याहून अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना संघाच्या प्रत्येक फलंदाजाने २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्या हा एकमेव कर्णधार होता, ज्याने आपल्या संथ फलंदाजीने सर्वांना निराश केले. त्यावेळी पठाणने ट्विटर ले होते, ‘जर संपूर्ण संघ २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असेल तर कर्णधार १२० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करू शकत नाही.’