यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकासह राजस्थानने मुंबईवर ९ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय मिळवला आहे. राजस्थानने यंदाच्या हंगामात मुंबईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यशस्वीने ६० चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह १०४ धावांची नाबाद खेळी केली. तर गोलंदाजी करताना संदीप शर्माने ४ षटकांत १५ धावा देत ५ विकेट्स घेतले आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. राजस्थानच्या पॉवरप्लेनंतर पावसाने हजेरी लावली. पण यामुळे राजस्थानच्या धावांना ब्रेक लागला नाही आणि संघाने अखेरीस जबरदस्त वजय मिळवत गुणतालिकेत १४ गुण मिळवले आहेत.

मुंबईने दिलेल्या १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलर आणि यशस्वीने शानदार सुरूवात केली. पॉवरप्लेपर्यंत या दोघांनी मिळून ६१ धावांचा डोंगर उभारला. यानंतर अचानक राजस्थानमध्ये पावसाला सुरूवात झाली. बराच काळ पावसामुळे थांबलेल्या सामन्यामध्ये डीएलएसनुसारही राजस्थानचा संघ पुढे होता. पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात पियुष चावलाने बटलरला क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी बटलरने २५ चेंडूत ६ चौकार लगावत ३५ धावा केल्या. यानंतर यंदा आयपीएलमध्ये सुरूवातीलाच बाद होणारा यशस्वी या सामन्यात चांगलाच फॉर्मात दिसला. यशस्वीने अवघ्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यानंतर शतकी खेळीसह यशस्वीने सर्वांची मने जिंकली. २०२३ मध्ये यशस्वीने मुंबईविरूद्धचं पहिले शतक झळकावले होते आणि यंदाही मुंबईविरूद्धचं आपले दुसरे शतक झळकावले आहे. तर यशस्वीला साथ देत संजूने २८ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांसह ३८ धावा केल्या. यशस्वीच्या फटकेबाजीमुळे इतर कोणत्याही फलंदाजाला फलंदाजीला येण्याची गरजच भासली नाही. मुंबईकडून फक्त पियुष चावलाला एक विकेट घेण्यात यश आले.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही, कारण मुंबईला सुरूवातीलाच लागोपाठ तीन मोठे धक्के मिळाले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ९ बाद १८९ धावा केल्या. रोहितने पहिल्या षटकात एक चौकार मारत बोल्टच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा बाद झाला. तर दुसऱ्या षटकात इशान किशन खाते न उघडता बाद झाला. तर सूर्यकुमार यादवही १० धावा करत स्वस्तात बाद झाला. यानंतर आलेला मोहम्मद नबीने एका षटकात १७ धावा करत मुंबईला पॉवरप्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारून दिली.

मुंबईच्या दोन युवा फलंदाजांनी मुंबईचा डाव सावरत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलक वर्मा आणि नेहल वधेराने ९९ धावांची शानदार भागीदारी रचली. तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आणि ४५ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारासह ६५ धावा केल्या. तर नेहलने २४ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ४९ धावा केल्या. यानंतर तिलकने विकेट गमावताच मुंबईने झटपट ३ विकेट्स गमावल्या. ज्यामुळे अखेरच्या षटकात मुंबईला ३ धावाच करता आल्या. तर बोल्टने २ विकेट आणि आवेश, चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विकेटसह चहलने आयपीएलमध्ये आपले २०० विकेट्स पूर्ण केले आहेत.