MI vs RR, IPL 2024: देशात सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक गल्लीबोळात आयपीएलविषयी चर्चा रंगतेय. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याचा आनंद घेताना दिसतोय. अलीकडेच जयपूरमध्ये झालेल्या ‘राजस्थान रॉयल्स’ विरुद्ध ‘मुंबई इंडियन्स’ या सामन्यातही लोकांचा उत्साह पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान ‘पिंक सिटी’मधील ‘सनीभाई’ने चाहत्यांची मने जिंकली आहेत. कारण- हा सनीभाई मुंबई इंडियन्स संघाच्या मदतीला धावून आला.

सनी भाईने नेमके केले काय?

मुंबई इंडियन्सची टीम जयपूरमध्ये ट्रॅफिकमध्ये वाईटरीत्या अडकली होती. यावेळी संघाच्या बसला ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासााठी एक तरुण धावून आला. त्याने रस्त्यातून सर्व गाड्या बाजूला करून मुंबई इंडियन्स संघाच्या बसला रस्ता मोकळा करून दिला. या तरुणाच्या टी- शर्टवर सनी, असे नाव लिहिले होते. त्यावरून अनेक जण आता या सनीभाईचे कौतुक करीत आहेत. त्याचा व्हिडीओ ‘मुंबई इंडियन्स’ टीमच्या अधिकृत हॅण्डलवरही शेअर करण्यात आला आहे; जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना

हा व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सनीने निळ्या रंगाची जर्सी घातली असून, त्यावर ७ क्रमांक छापलेला आहे. व्हिडीओमध्ये तो रस्त्यावरील ट्रॅफिक जाम सोडवून मुंबई इंडियन्सची बस बाहेर काढताना दिसत आहे. ट्रॅफिकमधून बाहेर येताच ‘मुंबई इंडियन्स’च्या खेळाडूंनीही टाळ्या वाजवून सनीचे आभार मानले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.

मुंबई इंडियन्सच्या @mipaltan हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, सनीभाईने जिंकले मन. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत; ज्या खूप रंजक आहेत.

“अरे, हा तर धोनीचा फॅन” युजर्सच्या कमेंट्स

अनेक युजर्सनी लिहिले की, सनीभाईने ७ नंबरची जर्सी घातली आहे. त्यावरून असे स्पष्ट होते की, महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीचा क्रमांक ७ असल्याने सनीभाई धोनीचा चाहता आहे. त्यामुळे धोनीचे चाहतेही सनीला जल्लोष करीत आहेत. अनेक युजर्सनी ट्रॅफिक पोलीस कुठे आहे, असा सवाल उपस्थित करीत हे त्यांचे काम, असे म्हटले आहे.